ट्रॅफिकच्या हवेद्वारे वीज
तुम्ही टॅफिक जाम म्हणजेच वाहतूक कोंडीला कधी ना कधी तोंड दिले असेल. परंतु याच ट्रॅफिकद्वारे वीज निर्माण केली जाऊ शकते असा विचार केला आहे का? हे विचित्र वाटत असले तरीही हे सत्य आहे.
इस्तंबुलच्या रस्त्यांवर या तंत्रज्ञानाद्वारे वाहनांमधून निर्माण होणाऱ्या हवेचा वापर वीज निर्मितीसाठी केला जात आहे. या नवोन्मेषाने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यात रस्त्यांच्या मध्ये उपकरणे लावलेली असून ती वर्टिकल टर्बाइन ट्रॅफिकच्या हवेद्वारे वीज निर्मिती करत असल्याचे यात दिसून येते.
तंत्रज्ञानाचे कार्यस्वरुप
इनलिल नावाचे हे टर्बाइन रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांद्वारे निर्माण होणाऱ्या वाऱ्याचा वापर करत वीज तयार करते. त्यांच्याकडून निर्मित ऊर्जा स्ट्रीट लाइट्स आणि अन्य उपकरणांना पॉवर देते. याचबरोबर तेथे लावण्यात आलेल्या सोलर पॅनेलद्वारे हे तंत्रज्ञान आणखी पर्यावरण अनुकूल ठरते. आकारात छोटे असणारे हे टर्बाइन दर तासाला एक किलोवॅट वीज निर्माण करण्याची क्षमता बाळगून आहेत. एक इनलिल टर्बाइनद्वारे दोन घरांना पूर्ण दिवसाची वीज पुरविली जाऊ शकते. इनलिल टर्बाइनमध्ये बिल्ट इन सेंसर लावण्यात आले असून ते तापमान, आर्द्रता, भूकंपीय हालचाली आणि कार्बन फूटप्रिंटची नोंद ठेवतात.
इनलिलची कल्पना केरेम देवसी नावाच्या उद्योजकाची आहे, इस्तंबुलमध्ये बस प्रवासादरम्यान त्यांना हा विचार सुचला, सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांनी स्वत:च्या बेडरुममध्ये याचा प्रोटोटाइप तयार केला, काही वर्षांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला होता.