ग्रामीण भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा
उद्योग-व्यवसायांवर परिणाम, सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी
बेळगाव : बेळगाव तालुक्यामध्ये मागील चार दिवसात विजेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. दिवसातून दहा ते पंधरा वेळा विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पावसाचा जोर दोन दिवसांपासून कमी झाल्याने आता तरी वीजपुरवठा सुरळीत करणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. आठवडाभरात झालेल्या सततच्या पावसामुळे ट्रान्स्फॉर्मरसह विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले. यामुळे सुरळीत वीजपुरवठा करताना अडचणी येत होत्या. दोन ते तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.
परंतु, तरीदेखील अद्याप ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच आहे. दिवसातून अनेकवेळा वीज ये-जा करत असल्यामुळे उद्योग, व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. सुरळीत वीजपुरवठा नसल्यामुळे तालुक्यातील अनेक गावे एक ते दोन दिवस अंधारात होती. अनेक ठिकाणी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले आहेत. रविवारी वाघवडे येथे विद्युत खांब उभा करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु, अद्यापही अनेक गावात सुरळीत वीजपुरवठा नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोबाईल चार्जिंगसाठीही शहरात धाव घ्यावी लागत असल्याने सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी करण्यात येत आहे.
लघुउद्योगांना बसतोय फटका
तालुक्यातील विविध गावात अनेक लघुउद्योग सुरू आहेत. काजू प्रक्रिया, खाद्यपदार्थ प्रक्रिया, कुक्कुटपालन, शेळीपालन, वेल्डींग यासह वाहनांची दुरुस्ती व इतर विजेवर चालणाऱ्या व्यवसायांना फटका बसत आहे. यामुळे कामगारांना काम नसताना बसावे लागत असल्याने उद्योजकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली जात आहे.