शहराच्या मध्यवर्ती भागात विजेचा खेळखंडोबा
पांगुळ गल्ली परिसर 20 तास अंधारात
प्रतिनिधी/ बेळगाव
भूमीगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात तब्बल 20 तास वीजपुरवठा ठप्प होता. शहराची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, भेंडीबाजार, आझाद गल्ली या भागात शुक्रवारी रात्रीपासून वीजपुरवठा ठप्प होता. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनदेखील हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका व्यापारी व नागरिकांना बसला.
शुक्रवारी रात्री 8 वाजता पांगुळ गल्ली परिसरात अचानक वीजपुरवठा ठप्प झाला. गल्लीच्या एका बाजूचा वीजपुरवठा सुरू होता तर दुसऱ्या बाजूचा बंद होता. यामुळे व्यापाऱ्यांनी हेस्कॉमकडे तक्रार केली. वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो अयशस्वी झाला. त्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच होता. नेमका बिघाड कोठे झाला आहे, हे मात्र कर्मचाऱ्यांना समजत नव्हते.
भेंडीबाजार, पांगुळ गल्ली कॉर्नर येथील गणपती मंदिरासमोर बिघाड झाल्याचे लक्षात आले. परंतु रस्त्याची खोदाई करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे शनिवारी दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते. सायंकाळी 6 वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु यामुळे पांगुळ गल्ली परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने हेस्कॉमच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
ट्रान्सफॉर्मरसाठी जागा मिळेना
पांगुळ गल्ली-भेंडीबाजार परिसरात रहिवासी, तसेच व्यावसायिक आस्थापने वाढली आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. ग्राहक वाढले तरी ट्रान्सफॉर्मरची संख्या कमी आहे. त्यामुळे हेस्कॉमकडून नव्या ट्रान्सफॉर्मरसाठी जागेचा शोध सुरू आहे. परंतु नागरिकांकडून ट्रान्सफॉर्मर बसविण्यास विरोध होत आहे. नवा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होईपर्यंत विजेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.