For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनधिकृत दुकान गाळ्यांचा वीज-पाणीपुरवठा बंद

10:35 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनधिकृत दुकान गाळ्यांचा वीज पाणीपुरवठा बंद
Advertisement

खानापूर न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी : तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची कारवाई : दुकान परवानेही रद्द करण्याचे आदेश

Advertisement

खानापूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सर्व्हे नं. 53/अ वरील जागेवर अतिक्रमण करून अनधिकृतपणे उभारलेल्या दुकान गाळ्यांचा वीजपुरवठा आणि नळपाणीपुरवठा नगरपंचायतीचे प्रशासक आणि तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या आदेशावरुन गुरुवारी तोडण्यात आले. तसेच सर्व दुकानगाळ्यांचे व दुकानांचे व्यावसायिक परवाने रद्द करण्याचे आदेशही बजावण्यात आले आहेत. यामुळे शहरातील अतिक्रमण करून जागा बळकावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या पुढील कारवाईकडे शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.खानापूर येथील क्रीडा मंडळ क्लबच्या जागेचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे.

मागीलवर्षी 30 ऑगस्ट रोजी खानापूर वरिष्ठ न्यायालयाने सर्व्हे नं. 53/अ ही जागा सरकारच्या मालकीची असल्याचा निकाल दिला होता. या जागेवर दावा सांगणारे लक्ष्मण शेट्टी यांनी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच खानापूर न्यायालयातही दावा सुरू आहे. न्यायाधिशांच्या निर्देशानुसार  या सरकारी जागेवर असलेल्या दुकानगाळ्यांचे भाडे सरकारला जमा करण्यात यावे, असे निर्देश दिल्याने तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी भाडेतत्त्वावर राहणाऱ्या गाळेधारकांची बैठक बोलावून भाडे सरकारला भरण्याची सूचना केली होती. मात्र भाडेकरुंनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी लेखी आदेश देवून या गाळ्यांचा वीजपुरवठा, पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नगरपंचायतीकडून देण्यात आलेले व्यावसायिक परवानेही रद्द करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.

Advertisement

50 वर्षाच्या भाडेकरारावर जागा

याबाबत माहिती अशी, खानापूर शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पाच गुंठे जागेबाबत गेल्या काही वर्षापासून वाद सुरू होते. सदर जागा क्रीडा मंडळ संस्थेला खेळ आणि सार्वजनिक उपक्रम राबविण्यासाठी पन्नास वर्षाच्या भाडेकरारावर देण्यात आली होती. यातील काही जागा क्रीडा मंडळाने बाबुराव शेट्टी यांना भाडेतत्त्वावर दिली होती. यानंतर या जागेतील काही भाग क्रीडा मंडळ संस्थेने लक्ष्मण शेट्टी आणि त्यांची पत्नीच्या नावे खरेदी दिली होती. लक्ष्मण शेट्टी यांनी क्रीडा मंडळकडून रीतसर जागा खरेदी केली असल्याने माझीच मालकी जाहीर करण्यात यावी आणि याबाबत मला मालक म्हणून घोषित करण्यात यावे, अशी न्यायालयात मागणी केली होती. लक्ष्मण शेट्टी यांच्या विरोधात निकाल लागल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने याबाबत लक्ष्मी शेट्टी यांच्या विरोधात निकाल दिला होता. तसेच निकाल देताना याबाबतची खानापूर न्यायालयाने फेरतपासणी करून निर्णय देण्याचे आदेश दिले होते. खानापूर वरिष्ठ न्यायालयाने शेट्टी यांच्या विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी गाळेधारकांना सरकारला भाडे जमा करण्याची सूचना केली होती.

सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान

गेल्या अनेक वर्षापासून लक्ष्मण शेट्टी यांनी या जागेवर अनधिकृत दुकानगाळे उभारुन गाळे भाड्याने दिले आहेत. त्यामुळे सरकारचे लाखो रु.चे नुकसान झाले आहे. नगरपंचायतीने या गाळ्यांना रितसर परवानगी दिली नसल्याचे नगरपंचायतीने सांगितले. याबाबत तहसीलदार प्रकाश गायकवाड ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, ही जागा शासनाच्या मालकीची असून जागा क्रीडामंडळ क्लबला लिजवर दिली होती. मात्र उताऱ्यावर नमूद असलेल्या नावामुळे ही जागा खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत सर्वच न्यायालयात सरकारच्या बाजूने निकाल लागला आहे. तसेच उच्च न्यायालयात लक्ष्मण शेट्टी यांनी दाद मागितली आहे. मात्र या ठिकाणीही सरकारच्या बाजूने सबळ पुरावे सादर करणार असून या ठिकाणीही आमच्याच बाजूने निकाल लागेल, अशी आशा आहे. जर उच्च न्यायालयात सरकारच्या बाजूने निकाल लागल्यास त्याच दिवशी हे अनधिकृत दुकानगाळे जमीनदोस्त करण्यात येतील, यासाठी उच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यात येत आहे.

अतिक्रमण करून जागा बळकावणाऱ्यांचे धाबे दणाणले

शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व्हे नं. 53/अ ही 5 गुंठे जागा क्रीडामंडळ क्लबला सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी लिजवर देण्यात आली होती. मात्र क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी गैरव्यवहार करून ही जागा शेट्टी यांना विकली होती. त्यावरुन गेली अनेक वर्षे न्यायालयात वाद सुरू होता. याबाबत शहरातील सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनेकर यांनी वेळोवेळी आवाज उठविला होता. या प्रकरणात त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही केला होता. यामुळे या दुकान गाळ्यांबाबत तहसीलदार व नगरपंचायतीच्या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमण करून जागा बळकावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement
Tags :

.