इलेक्ट्रीक वाहन विक्रीत 12 टक्के घसरण
वृत्तसंस्था/ कोलकाता
गेल्या नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत काहीशी नकारात्मकता दिसून आली. नोव्हेंबरमध्ये एकंदर 1,91,554 वाहनांची विक्री झाली असून विक्री 12 टक्के घसरली असल्याची माहिती उपलब्ध होते आहे.
ऑक्टोबरमध्ये पाहता इलेक्ट्रीक वाहन विक्री 2,19,021 इतकी राहिली होती. कारण त्या महिन्यात नवरात्र, दसरा व दिवाळी यासारखे मोठे सण साजरे करण्यात आले. उत्सवी काळात ग्राहकांचा कल वाहन खरेदीकडे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. एक आहे मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वाहन विक्री 1,45,197 इतकी होती, त्या तुलनेत पाहता यंदाच्या नोव्हेंबरमध्ये विक्रीत 31 टक्के वाढ नक्कीच दिसून आली.
सर्वच गटात विक्री घटली
एवढंच नाही इलेक्ट्रीक वाहनांच्या विविध प्रकारात पाहता एकाच प्रकारात विक्री घटली असे झालेले नाही तर जवळपास सर्वच प्रकारात वाहन विक्री कमी दिसून आली. दुचाकी, तिचाकी, चारचाकी यांच्या विक्रीत महिन्याच्या आधारावर 5 ते 25 टक्के या दरम्यान घसरण अनुभवायला मिळाली आहे. यातही इलेक्ट्रीक चारचाकी वाहनांच्या विक्रीत चांगला मार बसलेला दिसलाय. नोव्हेंबर महिन्यात 8,782 चारचाकी इलेक्ट्रीक वाहनांची विक्री झाली असून ऑक्टोबरमध्ये हाच विक्रीचा आकडा 11,587 इतका होता.
दुचाकी, तिचाकी विक्री
इलेक्ट्रीक वाहनांच्या एकंदर सर्व प्रकारातील विक्रीत दुचाकींचा वाटा हा 60 टक्के इतका गणला जातो. ही विक्री 15 टक्के कमी होत 1,18,944 इतकी नोव्हेंबरमध्ये दिसून आली आहे. याच्या मागच्या ऑक्टोबरमध्ये 1,39,787 इतक्या वाहनांची विक्री झालेली होती. तिचाकी वाहन विक्रीत फारशी घसरण झालेली दिसून आली नाही. नोव्हेंबरमध्ये तिचाकी विक्री 5 टक्के घटून 63,415 इतकी झाली. ऑक्टोबरमध्ये 67,182 इतक्या तिचाकींची विक्री झाली होती. देशांतर्गत पातळीवर एकंदर इलेक्ट्रीक वाहन विक्रीचा आकडा पाहिल्यास वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यात 1.8 दशलक्ष इतका टप्पा विक्रीने गाठला आहे.