झालं इलेक्शन....जपा रिलेशन...!
प्रचारातील मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी एकोपा जपण्याची गरज
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीने व ईर्षेने पार पडली. निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी निश्चितीपर्यंत नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. उमेदवारी जाहीर होताच प्रचाराचा धुरळा उडाला. यामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका होती. रात्रीचा दिवस करत कट्टर कार्यकर्त्यांनीही ‘सारं काही नेत्यासाठी..,’ असं म्हणत प्रचारामध्ये उडी घेतली होती. प्रचाराच्या रणधुमाळीत विविध भागात कार्यकर्त्यांमध्ये वादावादी, बाचाबाचीचे प्रकार घडले. प्रचारादरम्यान जवळच्या मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. मात्र सद्यस्थितीत झालं इलेक्शन...आता जपा रिलेशन... याप्रमाणे ‘झाले गेले वाद विसरून पुन्हा मने जुळवून घ्यावी, हीच खरी मैत्री व हीच खरी निवडणूक ठरेल.
आपला नेता निवडून यावा यासाठी जीवाचे रान करत कार्यकर्त्यांनी प्रचार केला. प्रचारादरम्यान नेत्यांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीकाटिप्पणी झाल्यामुळे निवडणूक रंगतदार स्थितीत आली. आपल्या नेत्याबद्दल इतर कार्यकर्त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी अगदी जवळीक असणाऱ्या मित्रांनी आपापसात भांडणे देखील केली. सोशल मीडियावर तर कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच प्रचाराचे वॉर पाहायला मिळाले. यातून अगदी जवळीक असणारी मित्रांची मने दुभंगली गेली. आता निवडणूक संपून निकालही जाहीर झाले आहेत. सर्व उमेदवार आपापल्या कामाला लागले आहेत. आता सरकार स्थापण्यासाठी नेत्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये अजूनही निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या वादांची धुसफूस सुरू आहे. निवडणूक म्हटलं की हार-जीत ठरलेलीच असते, याचा विचार करून प्रचारादरम्यान झालेली वाद, तंटा विसरून सहकारी मित्रांशी जुळवून घेण्याची गरज आहे.
जिह्यातील दहावी मतदारसंघांमध्ये महायुती व महाविकास आघाडी अशीच लढत झाली. यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. निवडणूक जिंकायची, असा निर्धार करून उमेदवारांनाही साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून प्रचार केला. प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीकास्त्र सोडले, अनेक गंभीर आरोपही केली. यातून काही वेळा वादाचे प्रसंगही घडले. या वादामध्ये अगदी एका गल्लीत, शेजारी शेजारी राहणारे प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतली. पक्षाच्या उमेदवारावर केलेली टीका सहन न झाल्याने घराशेजारी राहूनही मित्रांमध्ये वाद उफाळल्याच्या घटना घडल्या. 20 नोव्हेंबरला चुरशीने व इर्षेने मतदानही झाले. यावेळी कार्यकर्ते सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत बुथवर थांबून होते. त्यानंतर निकाला दिवशीही कार्यकर्ते दिवसभर आपापल्या उमेदवाराच्या मतदानाची आकडेवारी घेत होते. यातून ज्या पक्षाचे पारडे जड त्या पक्षाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोष करू लागले. प्रचारादरम्यान झालेल्या आरोपावरून जल्लोषावेळी काही ठिकाणी वादाच्या, काही ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्या. यातून जवळची मैत्री दुभंगली गेली. आता मात्र सारे काही विसरून जाऊन दुभंगलेली मने जुळवून घेतली तरच प्रभागाचा तसेच आपल्या भागाचा विकास अपेक्षित होऊ शकतो. यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
सोशल मीडियावर अजूनही वॉर
निवडणूक होऊन आता निकालही जाहीर झाला. यामध्ये महायुतीने एकतर्फी बाजी मारली. सोशल मीडियावर अजूनही काही उलटसुलट मॅसेज व्हायरल होत आहेत. यातूनही कार्यकर्त्यांमध्ये वाद होत आहेत. सोशल मीडियावर अजूनही वॉर सुरू आहे. कार्यकर्त्यांनी संयम बाळगून याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे.
आपापसातील वाद मिटवणे हीच खरी निवडणूक
निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होताच कार्यकर्तेही प्रचारात सक्रिय झाले. प्रचार दरम्यान, आरोप, प्रत्यारोपावरून मित्रत्वाच्या नात्यांमध्ये वादावादी, बाचाबाचीचे प्रकार घडले. निवडणुकीमुळे मैत्रीचे नाते कायमचे तुटू नये, यासाठी आपापसातील वाद मिटण्याची गरज आहे.