कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवडणूका स्थानिक पण दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

06:22 AM Dec 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे. गेल्या 15 दिवस या निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्याचे बघायला मिळाले. विशेषत: महायुतीतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात स्थानिक पातळीवर वर्चस्व वाढविण्यासाठी जो संघर्ष झाला, यावेळी मित्रपक्षांनी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील स्थैर्याबाबतच सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी मला कोणत्याही परिस्थितीत 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, आज चव्हाण यांची डेडलाईनही संपत आहे. उद्या निवडणुकीचा निकाल आहे.

Advertisement

या निकालावर राज्यातील पुढील महापालिका तसेच जिल्हापरिषद, पंचायत समीतीच्या निवडणुका तसेच नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये जसे कोणत्याही खेळाडुला विकत घेऊन एक संघ तयार कऊन खेळले जाते, तसेच या निवडणुकीचे स्थानिक पातळीवर चित्र दिसले.

Advertisement

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे. स्थानिक पातळीवर विकासाच्या दृष्टीने या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जातात. या निवडणुकीतूनच महाराष्ट्राला भविष्यातील उद्याचे राज्यव्यापी नेतृत्व मिळणार आहे. अनेक वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर या निवडणुका होत असल्याने याला एक वेगळे महत्त्व आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून जे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र सामोरे गेले, त्याच तीन पक्षांमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने वर्चस्व वाढविण्यासाठी कमालीचा संघर्ष पहायला मिळाला. भाजपने बहुतांश ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, त्याच ठिकाणी भाजपच्या विरोधात सगळे पक्ष एकवटल्याचे पहायला मिळाले. या निवडणुकीत पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा उफाळून आला, राज्य पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी आपल्या घरातल्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवताना काही ठिकाणी निवडणुकाच बिनविरोध घडवून आणल्या. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतच छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, सुधीर मुनगंटीवार, दत्ता भरणे, नितेश राणे, दिपक केसरकर, मकरंद पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अब्दुल सत्तार, धनंजय आणि पंकजा मुंडे या नेत्यांच्या मतदार संघातील  नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे निवडणुका जरी स्थानिक असल्या तरी कसोटी मात्र मोठ्या नेत्यांची लागली आहे. स्थानिक आमदार किंवा मंत्री आणि त्या आमदाराच्या विरोधात सगळे विरोधक एकवटल्याचे दिसले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात असलेला वाद या निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरपणे समोर आला.

कोकणात राणे बंधू एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, या निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या राजकीय उलथापालथी बघायला मिळाल्या, जे काल परवापर्यंत एकमेकांची तोंड बघत नव्हते ते आता शहर विकास पॅनेलच्या निमित्ताने एकत्र आल्याचे बघायला मिळत आहे. या निवडणुकांच्या निकालाचा हा शहरी भागात आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांवर होणार आहे. ठाणे शहराची आगामी राजकीय दिशा ठरवणारी अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहे, मात्र निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक आता 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात कमालीचा संघर्ष पहायला मिळाला. अंबरनाथ नगरपरिषद ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात येते. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटात शहकाटशहच्या राजकारणाने जोर धरला आहे. त्यामुळे अंबरनाथच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते, मात्र ही निवडणूक आता 20 डिसेंबरला होणार आहे.

उद्याच्या निकालानंतर कोणत्या पक्षाला किती यश मिळते, यावर आगामी महापालिका निवडणुकीची समीकरणे अवलंबून असणार आहेत. भाजपला सर्वाधिक यश मिळेल असा अंदाज आहे, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक जागा कोणाला मिळतात हे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्ताने होताना दिसला. मात्र एकनाथ शिंदे यांनी देखील प्रचारात आघाडी घेत आपला करिष्मा दाखवून दिला. अजित पवार यांनीदेखील महाराष्ट्र पिंजून काढला, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर स्थानिक पातळीवरची ही मोठी निवडणूक होत आहे.

भाजपने अनेक ठिकाणी मित्रपक्षांची युती करण्याची तयारी असताना, त्यांना डावलत स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय, भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी  ऑल व्हर्सेस भाजप हे गणित मांडताना भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांचा प्रभाव या निवडणुकीत कुठे जाणवला नाही. मुख्य भूमिकेपेक्षा या तीन पक्षांची भूमिका ही केवळ पॅनलला पाठिंबा देण्याचीच असल्याचे बघायला मिळाले. काही ठिकाणी तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवार देखील मिळेनासे झाले.

शेवटी गेल्या महिन्याभरापासून उडालेला प्रचाराचा धुरळा सोमवारी खाली बसला. आज या निवडणुकांसाठी मतदान होत असून छोट्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांचे भविष्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. या निवडणुकीत मतदारांची मानसिकता काय असणार आहे, मतदारांना  स्थानिक नेत्यांना भुलतात की मोठ्या पक्षांना स्विकारतात, केवळ विकासाच्या नावावर निवडणुकीसाठी हाडवैर विसऊन एकत्र आलेल्यांना जनता स्विकारते का, जनतेच्या मनात नेमके काय आहे, हे आजच्या मतदान यंत्रात बंद होईलच पण उद्याच्या निकालाचा परिणाम हा आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर देखील होणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Next Article