निवडणूक बिहारची तर परीक्षा कर्नाटकाची!
6 व 11 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे. 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर कर्नाटकातील सत्तासंघर्षाला गती मिळणार आहे. डी. के. शिवकुमार यांना रोखण्यासाठी व्यूहरचना करतानाच सतीश जारकीहोळी हे नकळत आपल्या विरोधकांची संख्याही वाढवत चालले आहेत.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एका जिल्ह्यापुरती ही निवडणूक मर्यादित असली तरी त्याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरही होताना दिसतात. यापूर्वी बेळगाव तालुका पातळीवर झालेली एक निवडणूक आणि या निवडणुकीत निर्माण झालेली चुरस एक सरकार पाडवण्यापर्यंत तिचे वैर पोहोचले. खेळीमेळीच्या आणि हातमिळवणीच्या राजकारणासाठी आधीपासूनच बेळगावची विशेष ओळख आहे. कोणत्या पक्षाचा नेता कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करेल याचा नेम नाही. सहकारी संस्था व सहकार चळवळ पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन जपली जाते. यंदा झालेल्या बीडीसीसी बँकेच्या निवडणुकीने मात्र राजकीय संघर्ष वाढवला आहे. याआधी हुक्केरी तालुका वीज संस्थेसाठी झालेल्या निवडणुकीत सुरू झालेली चुरस व सत्तासंघर्ष बीडीसीसी बँकेच्या निवडणुकीपर्यंत कायम होती. माजी मंत्री उमेश कत्ती यांचे बंधू रमेश कत्ती, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व सध्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला आहे.
बीडीसीसी बँक निवडणुकीत सतीश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी, रमेश जारकीहोळी हे बंधू एकत्र होते. 16 पैकी 9 जागांवर बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. गेल्या रविवारी 19 ऑक्टोबर रोजी 7 जागांसाठी मतदान झाले. अथणी तालुक्यातून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. रायबागमधून आप्पासाहेब कुलगुडे, रामदुर्गमधून मल्लाण्णा यादवाड हे विजयी झाले आहेत. निपाणी, हुक्केरी, कित्तूर, बैलहोंगल तालुक्यांचा निकाल न्यायालयाच्या आदेशामुळे राखून ठेवण्यात आला आहे. न्यायालयाची बंदी उठल्यानंतर हा निकाल जाहीर होणार असला तरी बीडीसीसी बँकेवर सतीश जारकीहोळी बंधूंची सत्ता आली ही गोष्ट निर्विवाद आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला संघर्ष कुठेपर्यंत पोहोचणार, याचा काही नेम नाही. केवळ हे नेतेच नव्हे तर त्यांच्यानंतरची पिढीही या संघर्षात उतरली आहे. एकमेकांबद्दल एकेरी शब्दात टीका होऊ लागली आहे. अडीच वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही याचे पडसाद उमटणार आहेत.
रमेश जारकीहोळी विरुद्ध लक्ष्मण सवदी हा संघर्ष जुनाच आहे. या ना त्या कारणाने अथणीत हस्तक्षेप करीत लक्ष्मण सवदी यांना डिवचण्याची एकही संधी रमेश जारकीहोळी सोडत नाहीत. बीडीसीसी बँक निवडणुकीत माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांनी अथणीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना केवळ 3 मते मिळाली. महेश कुमठळ्ळी यांचा पराभव होणार हे माहिती असूनही आम्ही त्यांना अर्ज भरायला लावला होता, असे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले आहे. बीडीसीसी बँकेनंतर अथणी येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठीही एक पॅनेल तयार करण्यात आले आहे. या पॅनेलची घोषणाही झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्ष आणखी तीव्र होणार हे स्पष्ट आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अनेक नेत्यांचे राजकीय भविष्य घडले-बिघडल्याची उदाहरणे आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लिंगायत-बिगरलिंगायत हा वादही वाढला आहे. जारकीहोळी बंधू हे लिंगायतविरोधी आहेत, असा प्रचार केला जात आहे. हा आरोप पुसण्यासाठी मध्यवर्ती बँकेचा चेअरमन लिंगायत समाजाचाच होणार, हे जारकीहोळी बंधूंनी जाहीर केले आहे.
अथणी येथे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी लक्ष्मण सवदींवर केलेली टीका, या टीकेला स्वत: लक्ष्मण सवदी व त्यांचे चिरंजीव चिदानंद सवदी यांनी दिलेले उत्तर पाहता हा संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण काही नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर निकराच्या झुंजीसाठी तयार व्हावेच लागणार आहे. हुक्केरीतून माजी खासदार रमेश कत्ती यांनी या कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक तालुक्यात जारकीहोळी बंधूंचे विरोधक एकवटताना दिसत आहेत.
सत्तासंघर्षासाठी राजकीय नेते पातळी सोडून एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. हुक्केरी वीज संघ व बीडीसीसी बँकेच्या निवडणुकीने जारकीहोळी विरोधकांना एकत्र आणले आहे. गेल्या एक-दोन महिन्यांपासून बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता राज्य राजकारणावरही नजीकच्या काळात याचे परिणाम दिसून येणार, याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. या घडामोडी सुरू असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चिरंजीव डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी रायबाग तालुक्यातील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने राज्य राजकारण ढवळून निघाले आहे. आपले वडील सिद्धरामय्या हे आपल्या राजकीय जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. त्यांचा वैचारिक वारसा चालवण्याची ताकद केवळ सतीश जारकीहोळी यांच्यात आहे. सिद्धरामय्या गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटले, सामाजिक न्यायासाठी झटले, ते काम सतीश जारकीहोळी पुढे चालवत आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी तेच योग्य आहेत, असे डॉ. यतिंद्र यांनी जाहीर केले आहे.
सतीश जारकीहोळी यांनीही आपण 2028 मध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरणार आहोत, असे अधूनमधून सांगितले आहे. एकीकडे काँग्रेस सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत असताना नेत्यांमध्ये ठरल्याप्रमाणे उर्वरित अडीच वर्षांसाठी डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याची वेळ जवळ आली आहे. यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असतानाच डॉ. यतिंद्र यांनी सिद्धरामय्या यांचे राजकीय उत्तराधिकारी सतीश जारकीहोळी हेच असतील, असे जाहीर केले आहे. ही गोष्ट इतर कोणत्याही नेत्यांनी बोलली असती तरी त्याला इतके महत्त्व प्राप्त झाले नसते. स्वत: मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांच्या तोंडातून ते बाहेर पडले आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. डी. के. शिवकुमार यांनी डॉ. यतिंद्र यांच्या वक्तव्यावर उत्तर देणे टाळले आहे. तुम्ही त्यांनाच विचारा, असे सांगून त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. बिहार निवडणुकीनंतर कर्नाटकातील घडामोडींना वेग येणार आहे. ठरल्याप्रमाणे डिसेंबर अखेरपर्यंत कर्नाटकात नेतृत्वबदल झाला नाही तर अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यताही आहे. याची कल्पना असल्यानेच सिद्धरामय्या यांनी अहिंद नेते व अहिंद वर्गाला एकाच छताखाली ठेवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. 6 व 11 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे. 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर कर्नाटकातील सत्तासंघर्षाला गती मिळणार आहे. डी. के. शिवकुमार यांना रोखण्यासाठी व्यूहरचना करतानाच सतीश जारकीहोळी हे नकळत आपल्या विरोधकांची संख्याही वाढवत चालले आहेत.