For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन नव्या निवडणूक आयुक्तांची निवड

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन नव्या निवडणूक आयुक्तांची निवड
Advertisement

लोकसभा निवडणुकीची घोषणा लवकरच शक्य

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयुक्त निवड समितीकडून दोन नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात आली आहे. हे दोघेही प्रशासकीय अधिकारी आहेत. सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार अशी त्यांची नावे असून ते अनुक्रमे पंजाब आणि केरळ येथील आहेत. निवड समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षातील नेते अधीर रंजन चौधरी आणि आणखी एक केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे. या समितीची गुरुवारी महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत समितीसमोर उत्पल कुमार सिंग, प्रदीप कुमार त्रिपाठी, ज्ञानेश कुमार, इंदेवर पांडे, सुखबीसिंग संधू आणि सुधीरकुमार गंगाधर राहते अशी सहा नावे ठेवण्यात आली होती. त्यांच्यापैकी सुखबीरसिंग संधू आणि ज्ञानेश कुमार यांची अंतिम निवड झाली.

Advertisement

बहुमताने निवड

समितीच्या तीन सदस्यांपैकी दोन सदस्यांनी या दोन अधिकाऱ्यांच्या नावाला संमती दिली. तथापि, तिसरे सदस्य चौधरी यांनी आपला आक्षेप लेखी सादर केला. समितीत सरन्यायाधीशांना स्थान न देणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. समितीसभोर ज्यांची नावे सादर करण्यात आली, त्यांच्या निवडीसंबंधी पारदर्शिता नाही, असाही आक्षेप त्यांनी नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नव्या आयुक्तांचा अल्पपरिचय

सुखबीर संधू हे मूळचे पंजाबचे असून ते उत्तराखंड केडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत. ते 2021 मध्ये पुष्करसिंग धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडचे मुख्य सचिव होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अध्यक्ष म्हणूनही सेवा दिली आहे. तर ज्ञानेश कुमार यांनी सांसदीय कार्य विभागाचे सचिव म्हणून कार्य केलेले आहे. ते मूळचे केरळचे असून केरळ केडरचेच आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय गृहविभागात सेवा देताना त्यांच्यावर राज्य घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्यासाठी सज्जता करण्याचे उत्तरदायित्व सोपविण्यात आलेले होते. ते महत्वाचे कार्य त्यांनी यशस्वीरित्या पार पाडून आपले प्रशासकीय कौशल्य सिद्ध केलेले आहे.

Advertisement
Tags :

.