घराणेशाही आणि प्रस्थापितांची निवडणूक
महाराष्ट्र विधानसभेची 2024 ची निवडणूक ही राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची निवडणूक असणार आहे. काही महिन्यांपूर्वी जातीय आरक्षणाचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढली जाईल असे वाटत असताना, आता केवळ आणि केवळ निवडून येणे आणि मतदारांना गृहीत धऊन त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून ही निवडणूक आपण जनतेच्या प्रेमापोटी लढवित असल्याची भावना उमेदवार बोलून दाखवत आहेत. पूर्वी निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर त्रिशंकु परिस्थिती निर्माण होत असे. आज उमेदवार जाहीर करत असतानाच जनतेपुढे चौरंगी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मतदारांना आपला उमेदवार कोण आणि कुठल्या पक्षाचा आहे हेच कळायला मार्ग नसल्याने या निवडणुकीत सर्वात कसोटी ही मतदारांची असणार आहे. लोकसभा निवडणुकीत शहरी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले, जी बाब चिंताजनक होती, राजकीय पक्षांची पडलेली शकले, दोन्ही पक्षांच्या रॅलीत त्याच रंगाचे झेंडे असल्याने शेवटपर्यंत कळायला मार्ग नाही की रॅली नेमकी कोणत्या उमेदवाराची आहे, ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली त्याच महाराष्ट्राची या निवडणुकीत दशा झाल्याचे बघायला मिळत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस येऊन ठेपला तरी अद्याप काही मतदार संघातील महत्त्वाच्या पक्षांचे उमेदवार कोण? हा मोठा सवाल आहे. प्रस्थापित आणि घराणेशाही त्याचबरोबर निवडून येणे हा एकमेव निकष उमेदवारी देताना बघितला जात आहे. त्यामुळे काही ठराविक लोकांभोवतीच आज सत्ताकेंद्र निर्माण झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर अनेकांना आपली राजकीय महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत. ‘तुम्ही देता तर बोला नाही तर चाललो तिकडे’ हा सगळ्यात मोठा पर्याय उमेदवारांकडे असल्याने शेवटी पक्षाच्या नेत्यांना पण पर्याय राहिलेला नाही. राजकारणाच्या माध्यमातून झालेले गंभीर आरोप, तुरूंगवास, शिक्षा यामुळे ज्यांना उमेदवारी देता येणार नाही, त्यांच्या कुटुंबातील लोकांना उमेदवारी देण्यात आली. कल्याणमधील विद्यमान भाजपचे आमदार गणपत गायकवाड जेलमध्ये आहेत, मात्र त्यांच्या पत्नीला उमेदवारी, मोहोळमधून यापूर्वी आमदार झालेले रमेश कदम यांना अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या घोटाळ्यात तुरूंगवासाची शिक्षा झाली. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांची कन्या सिध्दी कदम यांना मोहोळमधून उमेदवारी दिली आहे तर नागपूरमधील सावनेर येथील काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुनिल केदार यांना बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झाली
तसेच निवडणूक लढविण्यास बंदी घातल्यानंतर आता त्यांच्या पत्नी अनुजा केदार या निवडणूक लढवित आहेत. तर तिकडे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी आपली पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे, तिकडे नगरमधून खासदार झाल्यानंतर निलेश लंके यांनी आपली पत्नी राणी लंके यांना आपल्या पारनेरच्या जागेवर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. एकीकडे आमच्या पक्षाचे धोरणच आहे की एका घरात एक पद असे सांगायचे मात्र निवडणुकीत त्याच घरात उमेदवारी द्यायची. एकीकडे घरातील लोकं वाढली तसे राजकीय पक्षही वाढले, एकाला या पक्षातून आमदार केल्यानंतर दुसऱ्याची चिंता त्याचे कसे होणार, मग तो दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी घेतो, शेवटी वसा समाजकारणाचा घेतला आहे, गणेश नाईक भाजपातून लढत असताना मुलगा राष्ट्रवादीतून भाजपच्याच उमेदवाराविरोधात लढत आहे. तिकडे निलेश राणे यांचे वडील भाजपातून खासदार असताना एका भावाला आमदारकीची उमेदवारी मिळालेली असताना, दुसऱ्या भावाने शिंदे गटात प्रवेश कऊन उमेदवारी मिळवली आहे. सध्या राजकारणाचे मार्केट इतकं टाईट झालं आहे की खासदारकी लढविलेले केंद्रीय मंत्रीपदी राहिलेले मिलिंद देवरा, संजय निरूपम हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विधानपरिषदेवर आमदार असलेल्या गोपीचंद पडळकर, भावना गवळी, राम शिंदे, शशिकांत शिंदे यांना विधानसभेत जायचे आहे, विधानसभेला निवडून गेल्यावर हक्काचा मतदार संघ तयार होतो.
शिवाय भाजपच्या विद्यमान मंत्रीमंडळात एक ही विधानपरिषदेचा आमदार नव्हता, त्यामुळे कदाचित विधानसभेतील आमदार म्हणून पुढच्या मंत्रीमंडळात स्थानही मिळू शकते. त्यामुळे या निवडणुकीत सगळी गणिते बदलली असून, केवळ तिकीट द्या मग ते कोणत्याही मतदार संघातील असू द्या, निवडून यायची जबाबदारी माझी अशी उमेदवारांची धारणा झाल्याने, महादेव जानकर परभणीत जाऊन निवडणूक लढतात तर दक्षिण मुंबईत राहणारे पियुष गोयल उत्तर मुंबईतून निवडणूक लढवतात. गोयल यांच्यासाठी राजकीय त्याग करणारे गोपाळ शेट्टी यांना पक्षाने खासदारकीला माघार घेण्याच्या बदल्यात बोरीवलीतून विधानसभा निवडणूक लढविण्याचे आश्वासन दिले होते, मात्र संजय उपाध्याय यांना शेवटच्या क्षणी बोरीवलीतून उमेदवारी दिली आहे. राजकीय त्याग करणाऱ्या शेट्टी यांचा भाजपने आनंदराव देवकाते केला आहे, हे सगळं होत आहे. राजकीय पक्षांनी मतदारांना गृहीत धरल्याने, शहरी मतदारांना तर काही पडलेले नाही, चलता है या वृत्तीमुळे कुठचाही उमेदवार कुठेही लढत आहे. शहरातील लोकांमध्ये राजकारण्यांविषयी असलेली उदासिनता हेच प्रमुख कारण आहे, मात्र तिकडे शिकलेल्या लोकांपेक्षा जे मुख्य प्रवाहात नाहीत त्या आदिवासी भागात आजही मतदान जास्त होत आहे. हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसले.
गडचिरोली, चंद्रपूर या दुर्गम भागात देखील मतदानाची टक्केवारी मुंबई, पुणे नागपूरपेक्षा जास्त होते. डहाणू सारख्या आदिवासी भागातून एक सर्वसामान्य विनोद निकोले सीपीएम पक्षातून आमदार होतो, तर नाशिकमधील कळवणमधून सलग सात वेळा जीवा पांडु गावित निवडून येतात, येथील मतदार हे जरी मुख्य प्रवाहात नसले तरी ते त्यांच्या समस्या आणि प्रश्न अजून कायम असल्याने ते निवडणुकीत भाग घेतात. त्यांना अपेक्षा असते ती कोणी तरी परीवर्तन करेल याची. शहरात मात्र आज फक्त इंटरनेटच्या समस्येशिवाय कोणती समस्या राहिलेली नसल्याने तरूणांमध्ये मतदान करण्याची उमेदच राहिलेली नाही. त्यामुळे उमेदवार कोणीही असला तरी मतदार जागृत असेल तर काय करू शकतो हे यापूर्वी अनेक निवडणुकांनी दाखवून दिले आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, सर्वच पक्षांचे उमेदवार आज आपले अर्ज भरतील त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल.
प्रवीण काळे