महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेत निवडणुकीची धामधूम

06:30 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अमेरिका ही प्रथम क्रमांकाची महासत्ता असल्याने आणि जगाच्या राजकारणावर तिचा मोठा प्रभाव असल्याने तेथील अध्यक्षीय निवडणूक जगाच्या कुतूहलाचा आणि निरीक्षणाचाही विषय असते. असेही काही मान्यवरांचे मत आहे, की अध्यक्षीय निवडणुकीसंबंधी प्रत्यक्ष अमेरिकेतील मतदारांनाही जितके स्वारस्य वाटत नाही, तितके ऊर्वरित जगाला वाटते. सर्वात जुनी लोकशाही मानल्या गेलेल्या या देशात अध्यक्षपदासाठी प्रामुख्याने रिपब्लिकन पक्ष आणि डेमॉव्रेटिक पक्ष या दोनच पक्षांमध्ये स्पर्धा असते. अन्य पक्षही आहेत पण ते अगदीच किरकोळ असल्याने त्यांचा विचारही करण्याचे कारण नसते. यंदा अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डेमॉव्रेटिक पक्षाचे जोसेफ बायडेन आणि माजी अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप यांच्यात चुरशीचा संघर्ष होईल, हे निश्चित मानले जात होते. तथापि, काही दिवसांपूर्वी या निवडणुकीने नाट्यामय वळण घेतल्याने ती अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. बायडेन यांनी निवडणुकीतून चक्क माघार घेतली असून डेमॉक्रेटिक पक्षाची उमेदवारी सध्या या देशाच्या उपाध्यक्षा असणाऱ्या कमला हॅरिस यांना मिळाली आहे. विद्यमान अध्यक्षाने निवडणुकीच्या स्पर्धेतून माघार घेण्याचा अमेरिकेच्या इतिहासातील 1968 नंतरचा हा प्रथम प्रसंग आहे. त्यापूर्वी 1952 मध्ये हॅरी ट्रूमन, 1884 मध्ये चेस्टर आर्थर, 1868 मध्ये अँड्रू जॉन्सन, 1856 मध्ये फ्रँकलीन पियर्स, 1852 मध्ये मिलार्ड फिलमोर आणि 1844 मध्ये जॉन टेलर या अध्यक्षांनी जनतेच्या पाठिंब्यात घट झाल्याने अशी माघार घेतलेली आहे. त्यामुळे बायडेन यांची माघार हा तेथील पहिलाच प्रसंग नाही. तरीही त्याचे महत्त्व आहे. कारण असा प्रकार दुर्मिळ मानला जातो. अध्यक्षपदाच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये निवडणुकीपूर्वी सार्वजनिक चर्चेचे साधारणत: तीन कार्यक्रम करण्याची तेथे पद्धत आहे. या चर्चांमध्ये किंवा वादविवादांमध्ये जो जिंकला असे तेथील लोकांना वाटते, तो अंतिमत: प्रत्यक्ष निवडणूकही जिंकण्याची शक्यता वाढते. तथापि, प्रत्येकवेळी असेच घडते असेही नाही. गेल्या चाळीस वर्षांचा विचार करता 1984 मध्ये रोनाल्ड रिगन हे वादविवादात पराभूत झाले होते पण निवडणुकीत विजयी झाले. असाच प्रकार 2004 मध्ये धाकटे जॉर्ज बुश आणि 2012 मध्ये बराक ओबामा यांच्यासंदर्भातही घडला होता. त्यामुळे वादविवाद आणि निवडणुकीतील यश यांचा संबंध असतोच असे नाही. तरीही बायडेन यांनी वादविवादाच्या पहिल्याच फेरीनंतर स्पर्धेतून माघार घेतली. त्यांची प्रकृती आणि त्यांना मधून मधून होणारे विस्मरण हे माघारीचे कारण दिसते. आता कमला हॅरीस मैदानात उतरल्या आहेत. त्या वयाने कमी आहेत आणि बायडेन यांच्या समस्या त्यांना नाहीत. त्यामुळे त्या ट्रंप यांना अधिक तगडी लढत देऊ शकतील अशी त्यांच्या पक्षाची अपेक्षा आहे. तथापि, या माघारीच्या घटनेमुळे डेमॉव्रेटिक पक्षाच्या वाटेत एक अडथळा निश्चितच निर्माण झाला आणि ट्रंप, ज्यांनी प्रचारात आधीपासूनच आघाडी घेतली होती, त्यांना आणखी एक प्रोत्साहन मिळाल्यासारखे झाले आहे. परिणामी, कमला हॅरीस यांच्या समोर दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे. ट्रंप यांनी प्रचारात आणि लोकप्रियतेतसुद्धा घेतलेली आघाडी मोडून काढणे आणि नंतर त्यांच्यावर कुरघोडी करणे असे दुहेरी प्रयत्न त्यांना करावे लागणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्षीय निवडणुकीचे वेळापत्रक पूर्वनिर्धारित असते. निवडणूक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ही निवडणूक होते. त्यामुळे ती यंदा 5 नोव्हेंबरला आहे. आतापर्यंतच्या सर्वेक्षणांच्या अनुसार यावेळी ट्रंप यांना जिंकण्याची संधी अधिक असल्याचे दिसून येते. आता डेमॉक्रेटिक पक्षाने नवा उमेदवार दिला असला तरी ट्रंप यांनी आघाडी राखली असल्याचे पहावयास मिळते. ट्रंप यांच्या नावावर दोन नकारात्मक विक्रम आहेत. त्यांच्या विरोधात दोनदा महाभियोग चालविण्यात आलेले ते या देशाचे पहिलेच अध्यक्ष होते. तसेच महाभियोग चालविलेला असून पुन्हा निवडणुकीची उमेदवारी मिळविणारेही ते प्रथमच नेते आहेत. तेथील दोन्ही प्रमुख पक्षांची समस्या अशी आहे की तरुण नेत्यांची त्यांच्याकडे वानवा आहे. अमेरिकेत प्रौढ आणि वृद्ध वयाच्या लोकांची संख्या अधिक असल्याने तो ‘वृद्ध होत जाणारा देश’ म्हणून ओळखला जातो. तरुणाईच्या कमतरतेचे प्रतिबिंब तेथील राजकारणावरही पडलेले दिसून येते, असे तज्ञ म्हणतात. दोन्ही पक्षांमध्ये जे तरुण नेते आहेत, त्यांच्यापैकी बहुतेकांचा देशव्यापी प्रभाव नाही. ते स्थानिक किंवा प्रांतीय राजकारणापुरते मर्यादित असलेले दिसून येतात. कमला हॅरिस या मूळच्या भारतीय वंशाच्या आहेत. मात्र, त्यांच्या आधीची एक पिढी अमेरिकेतच स्थायिक असल्याने त्यांना तशा अर्थाने ‘भारतीय’ मानता येत नाही, असेही म्हटले जाते. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर गेल्या अडीचशे वर्षांमध्ये श्वेतवर्णीय लोकांचाच पगडा राहिलेला आहे. तथापि, दीड दशकांपूर्वी बराक ओबामा या कृष्णवर्णीय नेत्याने निवडणूक जिंकून एक नवा इतिहास घडविला होता. आता कमला हॅरिस या बिगरश्वेतवर्णीय व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे. आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे आतापर्यंत एकाही महिलेने या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेली नाही. आठ वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रंप ज्या निवडणुकीतून अध्यक्ष झाले त्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन डेमॉव्रेटिक उमेदवार होत्या. खरे तर त्यांना ट्रंप यांच्यापेक्षा मतदारांची मते (पॉप्युलर व्होटस्) जास्त मिळालेली होती. पण अमेरिकेच्या पद्धतीनुसार अध्यक्ष थेट मतदारांनी निवडून द्यायचा नसतो. तर कॉलेजियम किंवा ‘निवडवृंदा’कडून तो निवडला जातो. ट्रंप यांना ही मते अधिक मिळाली कारण त्यांनी अधिक राज्यांमध्ये विजय मिळविला होता. त्यामुळे मतदारांची मते कमी असूनही ते अध्यक्ष होऊ शकले. यावेळी मात्र, त्यांनी चांगलाच जोर धरल्याचे दिसते. त्यामुळे मतदारांच्या मतांमध्येही ते आघाडी घेतील का, अशी चर्चा आहे. भारत आणि अमेरिका यांची गेल्या दोन दशकांमधील वाढती मैत्री आणि भागिदारी पाहता भारताच्या राजकीय नेतृत्वाचेही या निवडणुकीकडे लक्ष राहणारच आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article