डीसीसी बँक अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक
बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. बुधवार दि. 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता ही निवडणूक होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. रमेश कत्ती यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होणार आहे. बुधवारी दुपारी 3 वाजता संचालक मंडळाची बैठक होणार असून मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष कोण होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. उपलब्ध माहितीनुसार माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. अध्यक्षपदाच्या उर्वरित कार्यकाळासाठी होणाऱ्या निवडणुकीत माजी मंत्री व अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी आणि माजी उपमुख्यमंत्री व अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी या नेत्यांचा शब्द महत्त्वाचा ठरणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन तास आधी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.