आर्थिक व्यवहारांवर निवडणूक आयोगाची नजर
आर्थिक संस्थांच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांची नेमणूक
बेळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यामुळे 50 हजारापेक्षा अधिक रोखरक्कम वाहूतक करण्यास बंधन घालण्यात आले आहे. तर आर्थिक व्यवहारांवर निवडणूक आयोगाकडून नजर ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता जारी करण्यासंदर्भात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी कारवार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कित्तूर व खानापूर तालुका आपल्या व्याप्तीमध्ये येतात. त्यामुळे त्याठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात आर्थिक व्यवहारांवर अधिक नजर ठेवली जाते. त्यामुळे 50 हजारपेक्षा अधिक रोखरक्कम वाहतूक करता येणार नाही. यापेक्षा अधिक रक्कम वाहतूक केल्यास त्या संदर्भातील कागदपत्रांची व पुराव्यांची छाननी केली जाईल. अशी रक्कम वाहतूक करताना पुरावे ठेवणे आवश्यक आहे. बँक व ऑनलाईनद्वारे 10 लाखापेक्षा अधिक पैशांचा व्यवहार झाल्यास त्यावरही नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यातील सहकारी बँक, सोसायटी व आर्थिक संस्थांना दैनंदिन व्यवहारासंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार आहे. लाखो रुपयांची ठेव ठेवणाऱ्यांची व लाखो रुपये काढणाऱ्यांची माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना संधी दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक सभा, कार्यक्रमांसाठी सुविधाद्वारे परवानगी
राजकीय पक्षांच्या सभा कार्यक्रमांसाठी सुविधा एक खिडकी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी सभा-समारंभ घेण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. अर्ज पाहून नियमानुसार अर्ज निकालात काढण्यात यावेत, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केली.
नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
केंद्र व राज्य सरकारकडून सुरू असलेल्या लाभांच्या योजना थांबविल्या जाणार नाहीत. मात्र, नवीन कोणत्याच योजना आचारसंहिता काळात सुरू केल्या जाणार नाहीत. यात्रा, विवाह समारंभांसाठी परवानगीची आवश्यकता नाही. मात्र, अशा ठिकाणी कोणत्याच राजकीय उपक्रमांना निर्बंध असतील. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
राजकीय कार्यक्रमांसाठी 48 तास आधी करावा लागणार परवानगी अर्ज : निवडणूक विभागाकडून ‘सुविधा’ वेबसाईट सुरू
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण मतदारसंघात कोणतेही राजकीय सभा-समारंभ घेण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी राजकीय पक्षांना 48 तास आधी अर्ज करावा लागणार आहे, असे साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे कळविले आहे. आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी कार्यक्रम नियोजन करण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असल्याने सुविधा वेबसाईट्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सुविधा वेबसाईटवर 48 तास आधी ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी राजकीय कार्यक्रम सभा घेण्यापूर्वी सुविधा ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. https://suvidha.eci.gov.in/pc/public/login या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे, असे साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविले आहे.