नवाज शरीफ यांना निवडणूक आयोगाचा दिलासा
उमेदवारी अर्ज स्वीकारला : दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढविणार
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे 8 फेब्रवारी रोजी होणारी सार्वत्रिक निवडणूक लढवू शकणार का या प्रश्नाचे उत्तर अखेर गुरुवारी मिळाले आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने नवाज शरीफ यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून नवाज शरीफ यांच्यावर निवडणूक लढविण्यास आजीवन बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर आयोग कोणता निर्णय घेतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. नवाज शरीफ यांनी निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक लढविण्यावर घालण्यात आलेली बंदी आता निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाला 73 वर्षीय नवाज शरीफ यांच्या उमेदवारीवर आता कुठलाच आक्षेप नाही.
आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला आहे. अशा स्थितीत नवाज शरीफ हे लाहोर आणि खैबर पख्तूनखवाच्या मानसहरा शहरातून निवडणूक लढविणार आहेत. मानसहराला पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजचा (पीएमएल-एन) बालेकिल्ला मानले जाते. येथून नवाज शरीफ यांचा विजय निश्चित असल्याचे मानण्यात येत आहे. परंतु मानसहरा व्यतिरिक्त नवाज शरीफ हे लाहोर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. या ठिकाणी त्यांना इम्रान खान याच्या पीटीआय या पक्षाच्या उमेदवाराचे आव्हान पेलावे लागणार आहे. नवाज शरीफ हे अलिकडेच पाकिस्तानात परतले आहेत. इम्रान खान हे सध्या तुरुंगात असल्याने नवाज शरीफ हेच पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान होणार असल्याचे मानले जात आहे. शरीफ यांना पुढील काळात न्यायालयाकडून झटका न बसल्यास ते पंतप्रधान होऊ शकतात.