भाजप, काँग्रेस अध्यक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस
आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर मागितले उत्तर
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांकडून उत्तर मागितले आहे. दोन्ही पक्षांना सोमवारी म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:00 वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.
दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीदरम्यान 22 मे 2024 रोजी दिलेल्या सूचनांची निवडणूक आयोगाने आठवण करून दिली आहे. या अॅडव्हायझरीमध्ये स्टार प्रचारक आणि नेत्यांवर नियंत्रण ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. निवडणुकीच्या काळात सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन होऊ नये आणि निवडणूक प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहिता पाळली जावी यासाठी पक्षाध्यक्षांना निवडणूक आयोगाकडून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले होते.
सध्या महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून जाहीर प्रचाराने वेग घेतला आहे. झारखंडमध्ये निवडणुकीचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. तर महाराष्ट्रातील सर्व जागांसाठी आणि झारखंडमधील उर्वरित जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. याचदरम्यान, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजप आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आता निवडणूक आयोगाने भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना स्वतंत्र पत्र लिहून तक्रारीवर उत्तर मागितले आहे.