टीएमसी नगरसेवकाच्या हत्येचा प्रयत्न फसला
रायफलमधून गोळी बाहेर न पडल्याने शूटर सापडला जाळ्यात
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील कोलकात्यातील कसबा भागात तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नगरसेवकाच्या हत्येचा कट फसला. प्रभाग 108 चे नगरसेवक सुशांत घोष शुक्रवारी संध्याकाळी आपल्या निवासाबाहेर बसले होते. याचदरम्यान दुचाकीवरून तेथे दोघेजण आले. मागे बसलेल्या व्यक्तीने घोष यांच्यावर दोनदा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र रायफलमधून गोळी बाहेरच पडली नाही. आपल्यावर हल्ला होत असल्याचे लक्षात येताच सुशांत घोष यांनी शूटरला पकडण्यासाठी धाव घेतली. शूटरने स्कूटरवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण घोष यांनी त्याला पकडले. इतर लोकांचीही त्यांना योग्य साथ दिली. सदर शूटर्सला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. घोष यांच्या घरी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून त्यात ही घटना कैद झाली आहे.
पकडल्यानंतर आता हल्लेखोराची अधिक चौकशी केली जात आहे. तो बिहारी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला पॅमेऱ्यासमोर नेत प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. यावेळी त्याने आपल्याला केवळ सुशांत घोष यांचे छायाचित्र दाखवून हत्येची जबाबदारी देण्यात आली होती. आपल्याला एकही पैसा मिळालेला नाही, असे त्याने सांगितले. या घटनेमागे स्थानिक लोकांचा हात असण्याची शक्मयता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वैमनस्यातून कोणीतरी बिहारमधील शूटर भाड्याने घेतला असावा, असा संशय आहे.
आपल्या हत्येचा कट कोणी रचला असावा याची कल्पना नसल्याचे घोष म्हणाले. मी 12 वर्षे नगरसेवक आहे. माझ्यावर कोणी हल्ला करेल, असे मला कधीच वाटले नव्हते. माझ्या निवासाच्या परिसरात माझ्याबाबतीत असा प्रसंग घडेल, असा विचारही मी केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.