ज्येष्ठांचे 'आयुष्यमान' लटकले
मिरज / प्रशांत नाईक :
गरीबांच्या आरोग्यासाठी वरदान ठरलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या आयुष्यमान भारत कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. वेगवेगळ्या शिबीरांमध्ये कागदपत्रांसह नोंदणी केली असताना शिवाय दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांच्या शिधा पत्रिकेतील बारा अंकी क्रमांक समाविष्ट करुनही आभा कार्ड मिळत नाहीत. शिवाय आधार लिंक नसल्यानेही मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. बहुतांशी ज्येष्ठांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. ७० वर्षांपुढील लाभार्थ्यांना समन्वयक स्तरावर वही नोंदणीतून तातडीची मदत दिली जाते. पण त्यापेक्षा कमी वयाच्या रुग्णांनी जायचे कुठे? असा सवाल आहे. आयुष्यमान भारत कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांचे आजारपणातले आयुष्य सरकारी मदतीच्या भरवशावर लटकले आहे.
देशातील गरीब जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात, या हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू केली. प्रत्येक कुटुंबियांतील सदस्यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये मदत मिळण्याची तरतूद असणारी आयुष्यमान भारत योजना अंमलात आणली. ती प्रभावी जनजागृतीद्वारे तळागाळात पोहचवली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच त्यासाठी नोंदणी केली. जास्तीत जास्त लाभार्थी वाढविण्यासाठी घर टू घर नोंदणी अभियान राबविले. निकष पूर्ण करणाऱ्यांना कार्ड मिळाले. तर रेशन कार्डवरील १२ अंकी क्रमांक व आधार लिंक अशा तांत्रिक कारणांमुळे शेकडो अर्ज आजही प्रलंबित आहेत.
गेलेल्या वयाची अट ७० मोफत उपचाराच्या आशेने आभा कार्ड खिशात घेऊन रुग्णालयात लाभार्थ्यांची जणू चेष्टाच सुरू आहे. या योजनेतून लाखांची मदत मिळते, हे असले तरी त्याला वयाची घालण्यात आली आहे. सरकारने घोषित केल्यानुसार प्रत्येक कुटुंबातील प्रति व्यक्तीला पाच लाखांची मदत मिळते. पण त्यासाठी रुग्णाचे वय ७० पेक्षा जास्त असण्याची अट घातली आहे. मग ७० पेक्षा कमी वयाचे लोक आजारी पडत नाहीत का? असा सवाल उपस्थित झाला आहे. अपघातात जखमी असलेल्या व गंभीर प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी राज्य सरकारच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतेतून वेळ निभावून न्यावी लागत आहे.
नोंदणीचा डाटा संगणकात अडकला आयुष्यमान भारत योजनेच्या जिल्हा समन्वयक विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी शिबीरे घेतली गेली आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठांनी नोंदणी केली. सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक आणि जातीय आधारीत जनगणेतील पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबियांसह अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय व प्राधान्य कुटुंबियांतील व्यक्तीनी यासाठी अर्ज केले. शिबीरावेळी समन्वयक विभागाने अर्जदारांचा डाटा संकलीत केला. मात्र, आजपर्यंत संगणकातच अडकला आहे. शिबीरांमध्ये नोंदणी केलेल्यांना ना कार्ड मिळाले, ना उपचार चौकशी केल्यानंतर आधार लिंक व रेशन कार्डवरील १२ अंकी क्रमांकाचे कारण सांगितले जात आहे. मात्र, रेशन कार्डवरील १२ अंकी नंबर देऊनही कार्ड मिळत नसल्याच्या ज्येष्ठांच्या तक्रारी आहेत.
- वयाची अट, रुग्णांची फरफट
आयुष्यमान योजनेचा जितका बोलबाला झाला तितकी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. केवळ क्याचे कारण देऊन शेकडो अर्ज प्रलंबित राहिले आहेत. अनेकांना कार्ड मिळूनही योजनेचा लाभ घेता येत नाही. समन्वयक स्तरावर वही नोंदणी अंतर्गत केवळ ७० वर्षापुढील रुगणांना तातडीने मदत मंजूर करण्यात येते. मात्र, ५० ते ५५. ६० ते ६५ वयापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीपासून वंचित ठेवले जाते. ७० पेक्षा कमी वयाचे लाभार्थी योजनेस पात्र नसल्याने आभा कार्ड मिळूनही वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी फरफट सुरू आहे. त्यामुळे या योजनेचे निकष बदलण्याची मागणी होत आहे.
- शिबिर ठरले निष्फळ
आयुष्यमान भारत योजनेच्या समन्वयक विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर घेतले. यासाठी प्रत्येक शंभर रुपये घेऊन नोंदणी करण्यात आली. अनेक ज्येष्ठांनी नोंदणी केल्यानंतर त्यांचा डाटा संकलीत केला. प्रत्यक्षात आभा कार्ड मिळाले नाहीत. मदतीच्या आशेने नोंदणी केली. मात्र, नियम आणि अर्टीमध्ये ज्येष्ठांच्या उपचार खर्चाचा प्रश्न रखडला आहे. सुबोध भोकरे, ज्येष्ठ नागरिक संघ, मिरज
- वही नोंदणीतून तातडीची मदत
आयुष्यमान भारत योजनेचे अर्ज प्रलंबित नाहीत. यापूर्वी ज्यांचे कार्ड मंजूर झाले आहेत किवा ज्यांना कार्ड मिळाले नाहीत, त्यांना वही नोंदणीतून समन्वयक स्तरावरच तातडीची मंजूरी दिली जाते. आधार लिंकच्या कारणाने काही अर्ज प्रलंबित राहू शकतात. मात्र, त्यासाठी ७० वय पूर्ण असणाऱ्या गरजूंनी कार्ड मिळाले नसल्यास समन्वयक विभागाला संपर्क साधावा. सुभाष नांगरे, जन आरोग्य योजना समन्वयक