दानपेटीत पैसे टाकण्याच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास
कराड :
आगाशिवनगर (ता. कराड) येथील दत्तमंदिर परिसरात दानपेटीत पैसे टाकायचे आहेत असा बहाणा करून अनोळखी इसमाने वृद्ध महिलेची अडीच तोळ्यांची जोंधळी माळ लंपास केली. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने आगाशिवनगर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची नोंद कराड शहर पोलिसांत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोदा मास्तरराव पाटील (वय 83, रा. दत्त कॉलनी, मलकापूर) या आपल्या नातेवाईकांसह दत्तमंदिराजवळ बसल्या होत्या. त्यावेळी अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा पांढरी टोपी घातलेला इसम त्यांच्याजवळ आला. मला दानपेटीत पाच हजार रुपये टाकायचे आहेत, पण या पैशाला सोने लावायचे आहे असे सांगून त्याने यशोदा पाटील यांना विश्वासात घेतले व गळयातील सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली.
यशोदा पाटील यांनी गळ्यातील जोंधळी माळ त्याला दिली. मात्र माळ हातात घेताच तो बाहेर पळाला. त्याचवेळी दरवाजाबाहेर अंदाजे 20 ते 30 वर्षे वयाचा त्याचा साथीदार दुचाकी सुरू करून थांबला होता. पहिला इसम दुचाकीवर बसताच दोघे ढेबेवाडी फाटा, कराडकडे पसार झाले. घटनेनंतर यशोदा पाटील यांनी आपल्या सुना व कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यशोदा पाटील यांची सुमारे दीड लाख रुपये किमतीची अडीच तोळ्यांची दोन पदरी जोंधळी माळ चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.