बसच्या धडकेत वृद्ध ठार; दुचाकीस्वार जखमी
नागठाणे :
बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत एसटी बस चालकाने दुचाकीस मागून भीषण धडक दिल्याने मस्कोबा धोंडीबा माळवे (वय ७३, रा. बोरगाव) हे जागीच ठार झाले, तर दुचाकी चालक अनिल भगवान निकम (वय ५५, रा. अपशिंगे मिलिटरी, ता. सातारा) हे गंभीर जखमी झाले.
बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेनवर बुधवार १२ रोजी बोरगाव गावचे हद्दीत सकाळी ९.३० वाजता इचलकरंजी आगाराचे बसचालक सुशांत धोंडिराम शिर्के (वय ३२, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) यांचा बसवरील ताबा सुटल्याने पुढे चाललेल्या प्लेजर दुचाकीस मागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवर पाठीमागे बसलेले मस्कोबा माळवे जागीच ठार झाले, तर दुचाकी चालक अनिल निकम गंभीर जखमी झाले.
याची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अनिल निकम यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. बराच काळ विस्कळीत झालेली बाहतूक सुरळीत केली. याबाबतची फिर्याद शुभम अनिल निकम यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.