आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या सिंधी कॉलनीतील वृद्धाला अटक
मुलगा फरारी : दोन लाखांच्या रकमेसह मुद्देमाल जप्त
बेळगाव : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेळगाव शहर व उपनगरात जोरात बेटिंग सुरू आहे. शहर सीईएनच्या अधिकाऱ्यांनी सिंधी कॉलनी येथील एका घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात बेटिंग घेणाऱ्या एका वृद्धाला अटक केली आहे. त्याचा मुलगा फरारी झाला आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. सिंधी कॉलनी परिसरातील एका घरात बेटिंग घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, कॅम्पचे पोलीस उपनिरीक्षक बी. एम. बोधनूर, मल्लिकार्जुन यादवाड, के. व्ही. चरलिंगमठ, सी. बी. दासर, विजय बडवण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून ही कारवाई केली.
पोलिसांनी उद्धव जयरामदास रोचलानी (वय 61) याला अटक केली आहे.त्याचा मुलगा करण याच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला असून तो फरारी असल्याची माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली. घरात बसून व्यवस्थितपणे बेटिंग घेण्यात येत होती. या कारवाईवेळी 12 अँड्रॉईड व आयफोन, 13 बेसिक हँडसेट, 1 हॉटलाईन ऑडिओ मिक्सर, 1 स्मॉल टीव्ही, 2 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. कर्नाटक पोलीस कायदा कलम 78(ए)(6) अन्वये शहर सीईएन पोलीस स्थानकात पिता-पुत्रांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.