भरधाव कारने ठोकरल्याने कुकडोळीचा वृद्ध जागीच ठार
हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ घडला अपघात
बेळगाव : भरधाव कारने दुचाकीला ठोकरल्याने कुकडोळी (ता. बेळगाव) येथील एक वृद्ध जागीच ठार झाला. गुरुवारी सकाळी हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ हा अपघात घडला असून टायर फुटून कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची दुचाकीला धडक बसल्याचे पोलिसांनी सांगितले. कलगौडा रुद्रगौडा हुब्बळ्ळी (वय 67) रा. उमारेश्वरनगर, कुकडोळी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे. कारचालक रॉबर्ट रॉड्रिग्ज, रा. मुंबई याच्यावर एफआयआर दाखल केला आहे.पुणे-बेंगळूर महामार्गावरील हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ धारवाडहून बेळगावकडे येणाऱ्या कारची एक्सल-100 दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार वृद्ध कलगौडा हुब्बळ्ळी यांच्या डोक्याला दुखापत झाली. जागीच त्यांचा मृत्यू झाला. हिरेबागेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.