चिकोडी जिल्ह्याची घोषणा करा
आमदार गणेश हुक्केरींची मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने त्वरित चिकोडी जिल्ह्याची घोषणा करावी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जिल्हा विभाजनासंबंधी निर्णय घ्यावा, अशी मागणी चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांवर आपला विश्वास आहे. अधिवेशनाच्या काळातच खासदार, आमदार, माजी आमदारांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यासंबंधी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कृष्णा नदीतील पाणी उपसा योजना मार्गी लागावी, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. जैन धर्मियांसाठी महामंडळाची स्थापना करावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुकूल ठरणार आहे.
चिकोडी येथे 35 कोटी रुपये खर्चून न्यायालय इमारत उभी करण्यात आली आहे. कायदा व संसदीय कामकाज मंत्र्यांनी त्वरित या इमारतीचे उद्घाटन करावे. चिकोडीसह जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना द्यावी. सध्या नोकरीनिमित्त तरुणाई पुणे, कोल्हापूरला जात आहे. ते थांबवायचे असेल तर औद्योगिक विकास करा, असा सल्ला त्यांनी दिला. उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलताना गणेश हुक्केरी यांनी केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्रात केलेल्या सेवेचा गौरवाने उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी त्वरित चिकोडी जिल्ह्याची घोषणा करावी. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल,असेही गणेश हुक्केरी यांनी मत मांडले.