ताशिलदार गल्लीत वृद्ध दाम्पत्याची गळफासाने आत्महत्या
आरोग्याच्या समस्येमुळे उचलले पाऊल : मार्केट पोलिसांत फिर्याद दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
ताशिलदार गल्ली येथील एका वृद्ध दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे.
सुभाष वासुदेव घाडी (वय 78), अनसुया सुभाष घाडी (वय 77) अशी या दुर्दैवी वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. शनिवार दि. 22 मार्चच्या सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 या वेळेत ही घटना घडली असून आरोग्य समस्येमुळे या दाम्पत्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले असावे, असा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घरातील काही मंडळी कामावर गेली होती. तर काही जण सुळेभावी यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. मुलगा सहदेव घाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.