इजिप्तमध्ये अल-सिसी यांची हॅटट्रिक
सलग तिसऱ्यांदा झाले अध्यक्ष
वृत्तसंस्था/ कैरो
इजिप्तमध्ये अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अब्देल फतह अल-सिसी यांनी विजय मिळविला आहे. याचबरोबर सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अल-सिसी हे 9 वर्षांपासून इजिप्तचे अध्यक्ष आहेत. आता पुढील 6 वर्षांसाठी ते पुन्हा अध्यक्ष होणार आहेत. इजिप्तच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अल-सिसी यांच्या विजयाची घोषणा केली आहे. अल-सिसी यांना एकूण मतांपैकी 89 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली असल्याचे सांगण्यात आले.
अध्यक्षीय निवडणुकीसाठी इजिप्तमध्ये 66.8 टक्के मतदान झाले होते. अल-सिसी यांच्यासमवेत एकूण 4 उमेदवार या निवडणुकीत उभे होते. अल-सिसी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला केवळ 4.5 टक्के मते मिळाली आहेत. प्रमुख विरोधी उमेदवार अहमद तंतावी यांनी धमकी मिळाल्याचा दावा करत मतदानापूर्वीच स्वत:चा अर्ज मागे घेतला होता.
अल-सिसी हे सैन्यप्रमुख देखील राहिले आहेत. 69 वर्षीय अल-सिसी यांनी सैन्यप्रमुख म्हणून 2013 मध्ये मोहम्मद मोर्सी यांना पदच्युत केल्यावर 2014 मध्ये अध्यक्षपद स्वीकारले होते. यानंतर 2018 च्या निवडणुकीत तेच विजयी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अल-सिसी यांच्या विजयानंतर त्यांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि इजिप्तच्या रणनीतिक भागीदारीला वृद्धींगत करण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे मोदींनी नमूद पेले आहे.