महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक तापमान वाढीचं संकट राहणारच

06:19 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यंदाचं वर्षदेखील जागतिक पातळीवर सर्वाधिक तापमान वाढीचं राहिलं असल्याचा अहवाल नुकताच युरोपियन संघाच्या वैज्ञानिकांनी मांडला असून या योगे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 1 लाख 25 हजार वर्षांनंतर यंदा जागतिक तापमान वाढ सर्वाधिक राहिली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिना हा सर्वाधिक तापमान वाढीचा राहिला होता. 2019 ऑक्टोबरच्या तुलनेमध्ये पाहता मागच्या महिन्यामध्ये जागतिक तापमानामध्ये 0.4 डिग्री सेल्सियसने वाढ झाली आहे. ही बाब जगातील सर्वच देशांसाठी धोक्याची सूचना दर्शविते.

Advertisement

जागतिक तापमान वाढीचे संकट हे आगामी काळात राहणारच असल्याचे अनेक तज्ञांचे अंदाज असून या तापमान वाढीला रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या बाबतीत जगातील विविध देशांनी एकत्र येऊन तापमान वाढ रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेणे गरजेचे असणार आहे. युरोपमधील कोपरनिकस क्लायमेंट चेंज सर्व्हिस यांचा जागतिक तापमानासंदर्भातील अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी यंदाही तापमानात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. 2023 हे संपूर्ण वर्षच सर्वाधिक उष्ण असणार आहे, असेही सूचित केले आहे.

Advertisement

अलनिनो यांच्या आगमनामुळे यंदा मान्सूनच्या नियमित पावसावरही परिणाम दिसून आला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात यंदा बऱ्याचशा भागामध्ये पाऊस अपेक्षेएवढा झालेला नाही. अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे. यातून शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. वाहनांचे कार्बन प्रदूषण व इतर प्रदूषणाच्या माध्यमातून जागतिक हवामानामध्ये बदल जाणवत आहे. अलनिनोच्या परिणामामुळे पॅसिफिक ओशनच्या पूर्व भागामध्ये यंदा तापमान अधिक वाढले आहे. 2016 मध्ये सुद्धा अलनिनोमुळे तापमान वाढीचा सामना जगातील अनेक देशांना करावा लागला होता. 2023 मध्ये देखील अलनिनोचा परिणाम दिसला आहे. त्यांच्या मते 1 लाख 25 हजार वर्षानंतर पाहता यंदाचे वर्ष हे सर्वाधिक उष्ण तापमानाचे राहिल, असे भाकित केले आहे.

हिमालयातील बर्फाच्या वितळण्याच्या बातम्यानी आधीच संकटाची चाहूल दिली असून मागच्या काही महिन्यांमध्ये न्युयॉर्क व इतर देशांमध्ये आतापर्यंत झाला नव्हता एवढा पाऊस पडल्याचे दाखलेही हवामान बदलाच्या धोक्याचे संकेत देत आहेत. लिबीयामध्ये याच वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये हजारो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. उत्तर भारतामध्ये यंदा हिमाचल प्रदेशसह इतर राज्यांमध्ये पावसाने मोठे नुकसान केले आहे. 50 हून अधिक जणांना हिमाचल प्रदेशमध्ये आपला प्राण गमवावा लागला आहे. या भागातील रस्ते व पुलांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुसरीकडे ऑगस्टमध्ये दक्षिण कोरियालाही मोठ्या पावसाचा फटका बसला आहे. खनून या वादळाने दक्षिण कोरियाची पूर्ती वाट लावली होती. दक्षिण जपानलाही याचा फटका बसला आहे. चीन आणि बिजिंग यांनाही डोकसुरी या वादळाने धडक देत मोठा पाऊस होऊन अतोनात नुकसान झाले आहे. 140 वर्षानंतर असा विक्रमी पाऊस झाला असल्याचेही सांगितले जात आहे. स्वीडन आणि नॉर्वे हे देश देखील मोठ्या पावसामुळे पुराखाली गेले होते. ऑगस्टमध्ये हंस या वादळाने उत्तर युरोपच्या विविध शहरांमध्ये पुराची स्थिती निर्माण करून लोकांना संकटात टाकले. स्वीडनमध्ये तर अनेक रेल्वे मार्ग पूल ‘न भूतो न भविष्यती’ अशा पावसाने पाण्याखाली गेले होते.

तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकेत सर्वाधिक उष्ण तापमान जाणवले होते. ज्याने लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला होता. तर दुसरीकडे कॅनडामध्ये जंगलाला लागलेली आग जागतिक तापमान वाढीसाठी चिंताजनक ठरली आहे. जागतिक स्तरावर पाहता जमिनीवरील हवेचे तापमान सरासरी 15.3 डिग्री सेल्सियस इतके विक्रमी नोंदले गेले आहे. ऑक्टोबर 1850 ते 1900 या कालावधीच्या तुलनेमध्ये पाहता सदरच्या तापमानामध्ये 1.7 डिग्री सेल्सियस इतकी वाढ सरासरी मागच्या महिन्यामध्ये नोंदली गेली आहे.

अल निनोचा प्रभाव यावर्षी तर दिसेलच पण तो पुढच्या वर्षीही असणार असल्याची चिंतादायक बातमी अलीकडेच धडकली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीदेखील अनेक आव्हानांचा सामना जागतिक स्तरावर अनेक देशांना करावा लागणार आहे.  जागतिक हवामान संघटनेने या संदर्भातील धोक्याची सूचना नुकतीच दिली आहे. एप्रिल 2024 पर्यंत अल निनोमुळे अनेक नुकसानदायी घटना घडणार असल्याचे भाकित केले जात आहे. हंगामानुसार येणाऱ्या हिवाळा, पावसाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूमानाचे वेळापत्रक बिघडणार असल्याचे संकेतही व्यक्त केले गेले आहेत.

आगामी काळात जमिनीवरील व समुद्रातील तापमानामध्ये वाढ होणार आहे. यंदा जुलै ते ऑगस्ट कालावधीत अल निनोची सुरुवात झाली होती. सप्टेंबरपर्यंत याचा प्रभाव मध्यम स्वरुपाचा दिसून आला होता. नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2024 हा काळ अत्यंत काळजी वाढविणारा राहणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. उत्तर गोलार्धात हिवाळी हंगामात आणि दक्षिण गोलार्धात उष्णतेच्या काळात अल निनो आपला प्रभाव पाडू शकतो. या नंतरच्या काळामध्ये याचा प्रभाव कमी होत जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा जूनपासूनच तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली होती.

पुढचे वर्ष याहून अधिक तीव्र तापमानाचे असू शकते. त्यामुळे काही देशांमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र स्वरुपाच्या जाणवू शकणार आहेत. त्याचप्रमाणे काही देशांना प्रसंगी दुष्काळाचाही सामना करावा लागणार आहे. यासोबतच धुवांधार विक्रमी पावसाचे संकेतही व्यक्त केले गेले आहेत. जंगलांना लागणारी आग यानेही त्या त्या देशांची चिंता अधिक वाढणार आहे. अलनिनोच्या परिणामामुळे भारतात यावर्षी दक्षिण-पश्चिम मान्सूननुसार होणाऱ्या पावसाचे प्रमाण घटलेले आहे. 2030 ते 2050 या वर्षांमध्ये जागतिक तापमान बदलामुळे 2 लाख 50 हजाराहून व्यक्ती प्रतिवर्षी मृत्यूला सामोरे जाणार आहेत, असाही इशारा देण्यात आला आहे. मलेरिया, डायरिया आणि उष्णतेचा तीव्र झटका यामुळे वरील मृत्यू घडणार आहेत. या सर्वांवर वाहनांसह इतर प्रदूषण रोखून प्रयत्न करणे गरजेचे असणार आहे. आगामी काळामध्ये सामान्यांना आपल्या आरोग्याचे जतन वातावरणातील बदलानुसार करावे लागणार आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या अभावी 2 अब्ज लोक व खाद्याच्या संदर्भातील आजारातून 600 दशलक्ष लोकांना आरोग्याच्या समस्यांच्या तक्रारी झेलाव्या लागणार आहेत. आफ्रिका आणि आशिया भागात 2020 मध्ये 770 दशलक्ष लोक भूकबळीला कारण ठरले होते. हे सारे जागतिक तापमान बदलाचे परिणाम आहेत. एकंदर जागतिक तापमान वाढीचा धोका लक्षात घेऊन मनुष्याने पर्यावरणाचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असणार आहे. प्रदूषण संपवावे लागणार आहे.

- अतुल देशमुख

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article