महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आइनस्टाइनचे शिक्षण विचार

06:41 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘माझं जीवन सामान्य आहे. त्यात कोणाला स्वारस्य असणार नाही,’ असं आल्बर्ट आइनस्टाइनने स्वत:बद्दल अतिशय विनम्रतेने म्हटलं असलं तरी त्यांच्या मृत्यूनंतरदेखील त्यांच्याबद्दल जगभरच्या लोकांना विलक्षण कुतुहल आहे. एक मंदबुद्धि बालक ते जीनियस असा त्यांचा जीवनप्रवास थक्क करून सोडणारा आहे. ‘माझ्यात विशेष असं काहीच नाही. बस, मी जन्माला आलो इतकंच,’ असं एका रिपोर्टरला त्यांनी सांगितलं असलं तरी त्यांनी जन्माला येऊन विशेष काम केलं आहे, हे सर्व जग जाणतं.

Advertisement

‘कोणी मला समजून घेतलं नाही. तरीही लोकांना मी का आवडतो हे मला कळत नाही,’ हे त्यांना पडलेलं कोडं आहे. डोळ्यांमध्ये बुद्धिची विलक्षण चमक, सिंहाच्या आयाळीसारखे अव्यवस्थित केस, पायात मोजांचा पत्ता नाही, असं एक चमत्कारिक वाटावं असं व्यक्तिमत्व. 14 मार्च 1879 रोजी जन्म आणि 18 एप्रिल 1955 रोजी मृत्यू. 76 वर्षांच्या आयुष्यात अनेक शोध लावले. सापेक्षवादाचा सिद्धांत आणि E = mc2 हा फॉर्म्युला ही त्यांची ओळख. वेळोवेळी शिक्षणासंबंधी त्यांनी व्यक्त केलेले विचार कोणत्याही संवेदनशील विद्यार्थी आणि शिक्षकाला विचार करायला लावणारे आहेत.

Advertisement

‘केवळ माहिती प्राप्त करणं म्हणजे शिक्षण नसून, पुस्तकातून जे शिकता येतं त्यासंबंधी विचार करायला मनाला सवय लावणं यावर शिक्षणाचं मूल्य ठरतं,’ अशी त्यांनी थॉमस एडीसनच्या ‘कॉलेजचं शिक्षण निरुपयोगी आहे,’ या मतावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांच्या दृष्टीने जिज्ञासा, कुतुहल सर्वांत महत्त्वाचे यशस्वी थोर शास्त्रज्ञ किंवा गणिती होण्यासाठी जीनियस असण्यासाठीची गरज नाही. आपल्या अवतीभवतीच्या जगाबद्दल जिज्ञासू वृत्ती हवी, असं त्यांना वाटतं. त्यांचा चरित्रकार कार्ल सीलीगला यांना सांगितलं, ‘माझ्यापाशी विशेष बुद्धी नाही. पण मला प्रत्येक गोष्टीबद्दल प्रचंड कुतुहल आहे.’ काही लोकांजवळ जन्मत:च हे कुतुहल असते. ज्यांच्यापाशी जन्मत: ते नसतं त्यांना प्रयत्नपूर्वक ते साध्य करता येईल का? पालक आणि शिक्षकांना हे कुतुहल जागृत करता येईल का? त्या दिशेने निदान प्रयत्न करायला हवेत. ज्ञानप्राप्तीचं ते मूळ आहे.

वयाच्या पाचव्या वर्षी आल्बर्टला त्याच्या वडिलांनी कंपास आणून दिला. त्या कंपासच्या सुईने आल्बर्ट आश्चर्यचकीत झाला. त्या सुईचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर कायमचा राहिला. शिक्षण प्रक्रियेत प्रश्न अत्यंत महत्त्वाचे. वर्गात शिकवताना शिक्षक प्रश्न विचारतात. परीक्षेत प्रश्न विचारले जातात. काही विद्यार्थीही प्रश्न विचारतात. या प्रश्नासंबंधी आइनस्टाइनचं चिंतन महत्त्वाचं वाटतं. ते म्हणतात, ‘विद्यार्थ्याला जे येत नाही, माहीत नाही त्यासंबंधीचे प्रश्न विचारून बहुसंख्य शिक्षक मंडळी वेळ वाया घालवतात. वास्तविक विद्यार्थ्याला काय माहित आहे किंवा काय माहित करून घेण्याची क्षमता आहे हे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारणे ही खरी कला आहे. तेच खरं कौशल्य आहे.’ भौतिकशास्त्र शिकवताना आइनस्टाइन शेवटच्या परीक्षेत एक प्रश्न दरवर्षी विचारत. एका विद्यार्थ्याने आश्चर्याने विचारले, ‘सर, दरवर्षी तोच प्रश्न विचारल्यामुळे उत्तर देणे सोपे जात नाही का?’ त्यावर आइनस्टाइन म्हणाले, ‘मित्रा, प्रश्न तोच असला तरी उत्तर दरवर्षी बदलते हे लक्षात घ्या.’ अर्थात ही गोष्ट सर्वांच्याच लक्षात येईल असं नाही. कोरड्या कर्तव्य भावनेपेक्षा त्यांना विषय अथवा छंदाची आवड हाच थोर गुरु वाटतो.

शिक्षणाचं एक अत्यंत मूलभूत सूत्र आइनस्टाइननी मांडलं. ते सूत्र प्रत्येक शिक्षकानं अध्यापनात वापरायला हवं. ते म्हणजे स्वयंअध्ययन. ते म्हणत, ‘मी कोणाला कधी शिकवत नाही. मी केवळ अशी परिस्थिती आणि वातावरण निर्माण करतो जेणेकरून विद्यार्थी आपला आपणच शिकेल. विवेकानंद आणि योगी अरविंद यांनीही हाच विचार मांडला आहे. आज बहुतांश शिक्षक शिकव शिकव शिकवतात. पण अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. कारण शिक्षक अधिक सक्रिय असतात आणि विद्यार्थी निष्क्रिय असतात. कुतुहलाइतकीच त्यांना कल्पनाशक्ती प्रतिभा महत्त्वाची वाटते. कल्पनेचं महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणतात, ‘माहिती आणि ज्ञान यापेक्षा कल्पनाशक्ती ही अधिक महत्त्वाची. कारण ज्ञानाला मर्यादा आहेत. पण कल्पनाशक्ती अवघ्या विश्वाला गवसणी घालू शकते. त्यातून प्रगती साधते. माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा मला लाभलेली कल्पनाशक्ती ही मला अधिक महत्त्वाची देणगी वाटते. कारण त्यामुळेच मी सकारात्मक ज्ञान आत्मसात करू शकलो.’

डॉ. कलामही म्हणायचे, ‘स्वप्न बघा, स्वप्न बघा, स्वप्न बघा.’ प्रत्येकजण जीनियस आहे. यावर आइनस्टाइनचा अपार विश्वास होता. ते म्हणत, ‘प्रत्येकजण जीनियस आहे हे खरंच आहे. पण माशाला झाडावर चढता येतं का? यावर त्याचं मूल्यांकन केलं तर आयुष्यभर आपण मूर्ख आहोत असंच समजावं लागेल.’ प्रत्येकजण आपापल्या परीने जीनियस असतो. डॉ. हावर्ड नार्डनर यांनी अलीकडे हाच बहुविध बुद्धिमत्तेचा विचार मांडला आहे. आइनस्टाइनचा विचार शिक्षणाशी संबंधित प्रत्येकाने समजून घ्यायला हवा.

अभ्यासात कमजोर म्हणून मंदबुद्धिचा शिक्का मारून शिक्षकांनी आल्बर्टला शाळेतून घरी पाठवलं होतं. आज त्या शिक्षकांना कोणीच ओळखत नाही. पण आइनस्टाइनला सगळं जग नुसतंच ओळखतं असं नाही तर आदराने मस्तक झुकवतं. ‘आपल्याला अजून बरंच समजलेलं नाही, असं जो स्वीकारतो तोच खरा जीनियस,’ असं आइनस्टाइनने एकदा म्हटलं. आणि त्यांच्या स्वत:च्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरलं. कारण आपल्याला अजून खूप काही शिकायचं, समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं असंच प्रामाणिकपणे त्यांना वाटत होतं.

‘बुद्धिमान माणूस इतिहास वाचतो, अभ्यासतो. पण सणकी, मंदबुद्धि इतिहास घडवतो,’ या आइनस्टाइनच्या विचारात त्यांचंच प्रतिबिंब दिसतं खरं. ‘जर एखादा विषय तुम्हाला सोपेपणाने समजावून सांगता येत नसेल तर त्याचा अर्थ तुम्हाला तो विषय नीट समजलाच नाही,’ या त्यांच्या विचाराकडे शिक्षकांनी अधिक लक्ष दिलं आणि चिंतन केलं तर शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणातील एक मोठी समस्या नक्कीच दूर होऊ शकते. शिकण्यासाठी योग्य, अनुकूल आणि सकारात्मक वातावरण ही महत्त्वाची अट असते. शिक्षकांनी याकडे लक्ष द्यायला हवे. स्वत: आइनस्टाईन ही खबरदारी घेत असत. आनंदी आणि भयमुक्त वातावरण अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ व गतिशील बनते या वास्तवाकडे दुर्लक्ष होते. आइनस्टाइन शिक्षकांच्या लक्षात आणून देण्यासाठी म्हणतात, ‘रचनात्मक अभिव्यक्ती आणि ज्ञानसाधनेत आनंद जागवणं ही शिक्षकाची सर्वोच्च कला आहे.!’ ही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करणारा यशस्वी शिक्षक होऊ शकते. भय, जबरदस्ती आणि कृत्रिम अधिकार अशा पद्धतींच्या बळावर शाळा चालवणे  हे अत्यंत वाईट अशी त्यांची धारणा होती. अशा व्यवहारामुळे मुलांचा प्रामाणिकपणा, आत्मविश्वास संवेदना नष्ट होतात असा इशारा ते देतात. काही अज्ञानी आणि स्वार्थी शिक्षक अपमान आणि मानसिक त्रास देऊन अत्यंत कोवळ्या वयात मुलांच्या मनावर आघात करतात. परिणामत: मुलांच्या संपूर्ण जीवनात याचा विपरित परिणाम होतो, याबद्दल त्यांच्या मनात खंत आणि वेदना दिसते. आपल्या मुलाला लिहिलेल्या एका पत्रात ते गुणांची (मार्क्स) चिंता करू नकोस असे सांगतात. तुझं काम, अभ्यास मनापासून कर. प्रत्येक गोष्टीत भरपूर गुण (मार्क्स) च मिळवले पाहिजेत असे नाही, अशा आश्वासक शब्दात त्यांनी आपल्या मुलाचे मनोबल उंचावण्याचा पेलेला प्रयोग आज पालकांना उपयुक्त आहे. जीवन अखंड, अभंग आहे. पण माणसे ते विभागून दाखवतात. शिक्षणातही कला शाखेपेक्षा विज्ञानशाखा अधिक महत्त्वाची असा एक गैरसमज खूप दृढ झालेला आहे. कला आणि विज्ञान यात अनेक साम्यस्थळ आहेत हे सांगतात. दोन्ही विषयांमध्ये सृजन शीलतेचा आविष्कार घडत असतो.

‘धर्माशिवाय विज्ञान हे लंगडे, तर विज्ञानाशिवाय धर्म आंधळा.’ हा मौलिक विचार त्यांनी मांडला. विज्ञानाचा जेवढा अधिक अभ्यास करतो तेवढा माझा देवावर विश्वास वाढत जातोय अशी कबुली ते देतात. तर्क माणसाला ‘अ’ कडून ‘ब’ कडे जायला मदत करेल. पण कल्पनाशक्ती कुठेही घेऊन जाऊ शकते, म्हणून तर्काच्या जोडीला कल्पनाशक्तीही हवी. आइनस्टाइन आणि रवींद्रनाथ टागोर, दोघेही नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले महामानव. दोघांच्या भेटीच्या वेळी आइनस्टाइनचा जावई टिप्पणी घेत होता. त्यांच्या भेटीचे वर्णन करताना तो लिहितो, ‘टागोर म्हणजे विचारवंतांचे मस्तक असलेला कवी तर आइनस्टाइन म्हणजे कवीचे मस्तक कसलेला विचारवंत’. आइनस्टाइनना त्यांचे स्वत:चे चरित्र कधी आवडले नाही. स्वत:बद्दल कोणी लिहिलेले ते फारस वाचत नसत. आपल्या एका मित्राशी बोलताना एकदा ते म्हणाले ‘न वाचल्यामुळे आपण कौतुकाने बिघडत नाही आणि टिकेमुळे निराश होत नाही!’

‘नकारात्मक दृष्टीकोन असलेल्या माणसांपासून दूर राहण्याचे कारण ते सांगतात, ‘नकारात्मक माणसांपाशी प्रत्येक उत्तरासाठी समस्या असतेच’ आपले आयुष्य जगण्याचे दोनच मार्ग ते सूचवतात. पहिला मार्ग म्हणजे कोणतीही गोष्ट नवल नाही आणि दुसरा मार्ग म्हणजे प्रत्येक गोष्ट नवल आहे. बालकांच्या विचारांचा जोपपर्यंत खऱ्या अर्थाने विकास होत नाही तोपर्यंत उज्वल भविष्याची कल्पना ही करता येणार नाही. म्हणून आज शिक्षणामध्ये भावनात्मक बाजूवर सर्वाधिक भर द्यायला हवा. मानवी मूल्ये शिक्षणात अतिशय महत्त्वाची आहेत. याचा विसर पडता कामा नये असे त्यांना वाटते. ‘जे मोजता येते ते मूल्यवान असतेच असे नाही आणि जे मूल्यवान असते ते मोजता येतेच असे नाही,’ हा त्यांचा विचार किती मूलभूत आणि मूल्यवान आहे.

1936 मध्ये अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलत असताना त्यांनी शिक्षणासंबंधी मूलभूत विचार मांडले. स्वतंत्रपणे विचार करणारी माणसे घडवणे हा शिक्षणाचा मूळ हेतू असला पाहिजे. शिक्षण घेतल्यावर समाजाची सेवा करणे हा जीवनाचा अंतिम आणि महत्त्वाचा हेतू असायला हवा. भय, सक्ती आणि कृत्रिम अधिकार यांचा वापर करू नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी संस्था पालक आणि शिक्षकांना केली. ‘शाळेत शिकवलेले सगळे विसरून गेल्यावर जे शिल्लक राहते ते खरे शिक्षण’, हा त्यांचा विचार तर खऱ्या अर्थाने नवनीतच!

- दिलीप वसंत बेतकेकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article