महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसची आठ मते फुटली, अजितदादांचे काय होणार?

06:29 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विधान परिषद निवडणुकीत अजितदादांना फटका बसणार नाही याचे संकेत याच स्तंभात गत आठवड्यात दिले होते. तसेच घडले. अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण समर्थक काँग्रेसची आठ मते फुटली. पण, दोन्ही उमेदवार विजयी होऊनही अजितदादांवरील संकट दूर झाले का? संघाची नाराजी, शिंदेंवरचे भाजप श्रेष्ठींचे वाढते प्रेम आणि विधानसभेला दीडशे जागा भाजपने लढवाव्यात हा फडणवीस यांचा आग्रह याचा ताळमेळ साधताना पुन्हा अजितदादांनाच फटका बसण्याची शक्यता अधिक आहे

Advertisement

विधान परिषदेच्या निवडणुका आणि महायुतीचे जागावाटप यांचा अर्थार्थी काहीही संबंध नसला तरी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचाच एक उमेदवार पराभूत होणार यावर अगदी पैजा लावल्या गेल्या होत्या. लोकसभेतील दादांच्याच पक्षाची खराब कामगिरी ही चर्चा उठण्यामागे होती. त्यामुळे आपले उमेदवार विजयी होणार हे सांगण्यासाठी दादांना सिद्धिविनायका चरणी माथा टेकून नंतर शक्तीप्रदर्शन घडवावे लागले. दादांनी केलेला तो शो आता यशस्वी झाला असे म्हणता येईल.

Advertisement

भाजपने आपले पाच उमेदवार निवडून आणले, सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीच्या मतात बढत मिळेल अशी फडणवीसांनी केलेली रचना आणि सदाभाऊंसारख्या उमेदवाराची जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर अशा उमेदवारांच्यामध्ये कुचंबना होऊ नये म्हणून एका झुंजार अपक्ष आमदाराने खेळलेली आपले मत देण्याची खेळी सदाभाऊंना यश देऊन गेली. झुंज लागली ती मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात. शेका पक्षाचे जयंत पाटील आतापर्यंत अशी एक ही झुंज हरलेले नव्हते.

मात्र नार्वेकर यांच्या विजयासाठी दुसऱ्या पसंती क्रमांकात एक मत आवश्यक असताना जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडले. पाठोपाठ मिलिंद नार्वेकर विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना कुणाची आणि कशी मते मिळाली हा यापुढे वादाचा आणि चर्चेचा मुद्दा राहील. पण, एकाअर्थाने या लुटूपुटू तरीही दमदार लढाईत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना समोरासमोर आल्याचे आणि त्यातून शेकापक्षाच्या जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचे दिसून आले. ठाकरे सेनेने रायगडचा वचपा त्यांना असे टकमक टोक दाखवून काढला. शरद पवारांचा उमेदवार पराभूत झाला असे वातावरण निर्माण झाले. भाजपच्या नेत्यांना जे हवे आहे ते यातून घडले आहे. एका बाजूला ठाकरेंच्या निकटवर्तियाचा विजय आणि पवारांना धक्का, दुसरीकडे शिंदे यांना इशारा तर अजित पवार यांना मलमपट्टी! यातून भिविष्याच्या वाटा देखील शोधण्याचा प्रयत्न होईल.

पण, पुन्हा उध्दव ठाकरे भाजपच्या जवळ जातील असे नजीकच्या भविष्यात तरी दिसत नाही. कारण, जितकी त्यांची प्रतिमा 2019 नंतर बदलली आहे आणि मविआचे मुख्यमंत्री म्हणून व सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला आलेली झळाळी लक्षात घेतली तर आता ते घड्याळाचे काटे उलटे फिरवतील असे दिसत नाही. राष्ट्रवादी पक्षाविषयीच्या उलट सुलट चर्चेने हैराण असलेले खा. सुनील तटकरे दोन्ही उमेदवारांच्या विजयानंतर भलतेच बोलून गेले. वास्तविक यश सुद्धा पचवायची ताकद लागते. तितका धीर तटकरे राखू शकले नाहीत. अजितदादांच्या मित्रपरिवाराच्या मनातली ‘भडास’ यानिमित्ताने बाहेर निघाली. पण, त्यांची परीक्षा संपली असे झालेले नाही. अशावेळी त्यांनी सावरून बोलले पाहिजे होते.

अस्वस्थ भाजप, आश्वस्त शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शैलीच्या प्रेमात पडलेल्या भाजप श्रेष्ठींना समजावून सांगणे हे आता महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना एक काम होऊन बसले आहे. पक्षप्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या दौऱ्यानंतर बरोबर पंधराव्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 14 जुलैला पुण्यात येत आहेत.

महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना राज्यात दीडशे जागा लढवायच्या आहेत, तर शिंदेंना शंभरावर जागा हव्या आहेत. मग अजित पवारांचे काय हा पण प्रश्न उरतो. यामध्ये कुठेतरी राजकारण फिरत आहे आणि त्याचवेळी शरद पवारांनी आम्ही 225 जागा जिंकणार अशी गुगली टाकली आहे. ज्यावर भले भले क्लीन बोल्ड होऊ शकतात.

भाजपला स्वत:च्या आमदारांना पुन्हा तिकीट देतानाच राज्यातील अनेक नेत्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी द्यायची आहे. मात्र काही ठिकाणी अजित पवारांचा तर काही ठिकाणी एकनाथ शिंदेंचा त्याला अडथळा असणार आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीतील भाजपचा स्ट्राइक रेट फडणवीसांना मागे रेटण्यास कारणीभूत ठरत आहे. पक्ष प्रभारी जो संदेश घेऊन महाराष्ट्रात आले आहेत त्याच हिशोबाने प्रश्न करत आहेत.

जर एकनाथ शिंदे यांना निवडणुकीत चांगले यश मिळाले असेल तर त्यांना मोकळीक देण्याची गरज आहे शिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा जर जरांगे पाटील यांनी असाच तापवत ठेवला तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही पट्ट्यात जे नुकसान होईल ते टाळायचे असेल तर एकनाथ शिंदे यांना ढाल करून किंवा त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवून यश खेचून आणावे अशा भूमिकेपर्यंत भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व पोहोचले आहे. मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्र भाजपवर कायमचा होईल. एकनाथ शिंदे यांचे लोकसभेतील यश हे निर्भेळ यश नाही हे फडणवीस यांच्यासह विविध नेते सांगत आहेत आणि वरिष्ठ ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यात अजित पवार यांना होणारा विरोध लक्षात घेतला तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे आमिष दाखवून पक्षात बंड करायला लावले होते हा एक खूप मोठा मुद्दा आहे आणि शब्द पाळला नाही म्हणून भूमिका बदलायला आणखी एका नेत्याला विधानसभा निवडणुकीनंतर संधी मिळू शकते याकडे भाजपचे दुर्लक्ष होत आहे.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article