बेळगाव जिल्ह्यात सुरू होणार नवीन आठ रक्तपेढ्या
बेळगाव : दरवर्षी राज्यात रस्ते अपघात, प्रसूतीवेळी होणारा रक्तस्राव तसेच इतर कारणांमुळे हजारो जणांचा मृत्यू होत आहे. हे टाळण्यासाठी आरोग्य खाते 50 तालुका रुग्णालयांमध्ये फर्स्ट रेफरल युनिट (रक्तपेढ्या) सुरू करण्यास पुढे सरसावले आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील आठ तालुके आणि सामुदायिक केंद्रांमध्ये नवीन रक्तपेढ्या सुरू केल्या जाणार आहेत. यापूर्वीच रक्तपेढ्या सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून आवश्यक यंत्रसामग्री खरेदी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि केंद्र सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत रक्तपेढ्या सुरू करण्याची तयारी आरोग्य खात्याकडून सुरू आहे.
रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तालुका रुग्णालयात दाखल केले असता तातडीच्या उपचारादरम्यान रक्ताअभावी मृत्यू होत आहेत. तर 30 टक्के मातांचा मृत्यू हा रक्तस्रावामुळे होतो. विशेष करून ग्रामीण भागात वेळेवर रक्त न मिळाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे टाळण्यासाठी आरोग्य खात्याने फर्स्ट रेफरल युनिट राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे युनिट तालुका रुग्णालय आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू केले जाणार आहे. त्यामुळे तातडीच्या उपचारादरम्यान रक्तासाठी होणारी फरफट थांबण्यास मदत होणार आहे. रक्तपेढ्या उभारणीसाठी 2.50 कोटींचे अनुदान आरोग्य खात्याने राखीव ठेवले आहे. याची कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक सोसायटी (केएसएपीएस) च्या माध्यमातून अंमलबजावणी केली जाणार आहे. एका केंद्राला 2-0 तापमान रक्त साठवण्यासाठी दोन रक्तपेढी रेफ्रिजरेटर्स, सेंट्रिफ्युज, मायक्रोस्कोप, डी-इलेक्ट्रिक ट्यूब, सिलरची आवश्यकता असते. याशिवाय 3 ते 4 कर्मचाऱ्यांची याठिकाणी आवश्यकता असणार आहे.
21 जिल्ह्यात लवकरच रक्तपेढ्या
राज्यातील 21 जिल्ह्यात 50 तालुका आणि सामुदायिक रुग्णालयांमध्ये रक्तपेढ्या सुरू केल्या जाणार आहेत. त्यापैकी बेळगाव जिल्ह्यात 8, बेंगळूर, कोप्पळ जिल्ह्यात प्रत्येकी 5, कारवार, बेंगळूर ग्रामीण, हावेरी, हासन, गुलबर्गा, बळ्ळारी, विजापूर, उडुपी, रामनगर, म्हैसूर, मंड्या जिल्ह्यात प्रत्येकी 2, दावणगेरी, बिदर, चिक्कमंगळूर, बागलकोट, यादगिर, कोलार, चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात प्रत्येकी 1 नवीन रक्तपेढ्या सुरू होणार आहेत.