For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदींच्या कतार भेटीमुळे आठ भारतीयांना जीवदान

06:48 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदींच्या कतार भेटीमुळे आठ भारतीयांना जीवदान
Advertisement

पाकिस्तानच्या तावडीतून विंग कमांडर अभिनंदन यांना 48 तासांत भारतात मोठ्या आदराने परत आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखीन एक कमाल केली. पाकिस्तानशी जवळीक असलेल्या कतारमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या आठ नौदल अधिकाऱ्यांना अवघ्या चार महिन्यात दोषमुक्त करून त्यांची मायदेशात झालेली रवानगी म्हणजे मोदी सरकारची किमयाच म्हणावी लागेल.

Advertisement

कुलभूषण जाधव हे केवळ पाकिस्तानमध्ये असल्यानेच त्यांना परत आणणे भारत सरकारला शक्य झाले नसले तरी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात अडकलेल्या भारतीयांना माघारी आणण्याची उत्कृष्ट कामगिरी मोदी सरकारात असलेल्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री कै. सुषमा स्वराज आणि विद्यमान एस. जयशंकर यांनी केलेली आहे. कै. सुषमा स्वराज यांनी केवळ विदेशात वसलेल्या भारतीयांच्या एका संदेशाची दखल घेत आपल्या परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधीत देशातील राजदूतावासामार्फत मदत पोहोचविण्याचे आगळे वेगळे परराष्ट्र धोरण अंमलात आणले. याच धोरणाचे गोड फळ कतारमध्ये फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आठ भारतीयांच्या कुटुंबियांना चाखायला मिळाले.

स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती, अशा एक एक घटना घडत गेल्या अन् फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर केवळ 109 दिवसांत भारताचे आठ माजी नौदल अधिकारी 12 फेब्रुवारी रोजी सुखरूपपणे मायदेशी परतले. भारतीय नौदलाचे हे निवृत्त अधिकारी कतारमधील एका खासगी कंपनीमार्फत तेथील नौदल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत होते. ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीच्या मालकासहीत तेथील कर्मचाऱ्यांना कतारच्या पाणबुडीची गुप्त माहिती इस्त्रायलला पुरविल्याच्या संशयावरून अटक केली. यात आठ भारतीयांचा समावेश होता. 26 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांना तेथील न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कंबर कसली. त्याच दिवशी या खटल्या संदर्भात कागदपत्रांची मागणी केली. पण त्याला थंडा प्रतिसाद मिळाला. अर्थातच पाकिस्तानचा मित्र असलेल्या कतारकडून वेगळी अपेक्षा ठेवणे चुकीचे होते. पण भारताने मात्र प्रयत्नांमध्ये खंड पडू दिला नाही.

Advertisement

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हवामान बदल विषयक परिषदेत भाग घेण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेले असता 2 डिसेंबर 2023 रोजी कतारचे आमिर शेख तमिन बिन हमाद अल् थानी यांच्याबरोबर या विषयावर चर्चा केली. परिणामी 3 डिसेंबर रोजी आठ नौदल अधिकाऱ्यांसाठी भारतीय दुतावासाला वकिल नेमण्याची मुभा देण्यात आली. 22 डिसेंबर रोजी या आठ भारतीयांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात आली. अखेर 12 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्यावरील सर्व खटले रद्द करून सर्व भारतीयांना मायदेशी पाठविण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 डिसेंबर रोजी कतारच्या भेटीवर जात असल्याने आठ भारतीयांची फाशी रद्दबातल ठरविण्यात आली, अर्थात या घटनांची कोणालाही कल्पना आली नाही.

मागील आठवड्यात कतारमधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या  आठ भारतीयांना तेथील कारागृह अधिकाऱ्याने आपल्या

बॅगा भरण्याचे फर्मान सोडले. काही क्षणात या आठ भारतीय कैद्यांना न्यायला गाडी आली. गाडीतून त्यांना थेट भारतीय दुतावासासमोर आणून सोडले. या आठही भारतीयांना काय होतेय हे कळायच्या आतच, भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनी त्यांना भारतात आपल्याला परतायचेय असे सांगून न्यायला विमान तयार असल्याचे सांगितले. सोमवार 12 फेब्वारी 2024 रोजी सकाळीच त्यांचे आगमन दिल्लीच्या विमानतळावर झाले.

दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अमिरातीमधील मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले. संयुक्त अमिरातीनंतर कतारच्या एक दिवसीय भेटीवर जाण्याचा त्यांचा कार्यक्रम निश्चित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कतारभेटीपूर्वीच आठ भारतीयांना जीवदान मिळाले. मात्र केवळ मोदी भेटीमुळेच त्यांना कैद मुक्त केल्याचे म्हणणे धाडसाचे ठरेल.

कतार हा देश भारताशी वैचारीक मतभेद बाळगून आहे. केवळ भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी फाशीची शिक्षा दिलेल्या कैद्यांना सोडून देणे तसे अशक्य होते. मात्र मोदी सरकारच्या कुटनितीक, राजकीय आणि आर्थिक दबावाचा परिणाम म्हणून भारतीय नौदलाच्या माजी आठ अधिकाऱ्यांना सोडून देण्याचा निर्णय कतारचे अमीर थाणी यांनी घेतला.

कतारबरोबर 2028 पासून 20 वर्षांसाठी होणारा प्रस्तावित करार करण्यास भारताने चालढकल करण्यास सुरुवात केल्याने कतार संभ्रमावस्थेत सापडला होता. तसेच भारत सरकारने नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी

ऑस्ट्रेलिया, व्हेनेझुएला, कंबोडिया आदी देशांबरोबर करार करण्यासंबंधी चर्चा सुरु होती. भारताने नैसर्गिक वायूसाठी अन्य देशांबरोबर चर्चा करण्यास सुरुवात केल्याने कतारने सवलतीच्या दरात भारताला वायू पुरवठा करण्याची तयारी दर्शविली. तसेच आठ भारतीयांची भारतात पाठवणी करण्यासाठीची प्रक्रिया सुरु केली. अखेर आठ भारतीयांची फाशीची शिक्षा रद्दबातल ठरविण्यात आल्यानंतर मोदी भेटीत भारताकडून 48 अब्ज डॉलर्सच्या वायू पुरवठ्याच्या करारावर मोहोर उठविण्यात आली.

प्रशांत कामत

Advertisement
Tags :

.