सत्तरीत आठ इंच पावसाची नोंद
प्रतिनिधी/ पणजी
सांखळी, डिचोली, वाळपई तसेच सत्तरीच्या अनेक भागांना पावसाने शुक्रवारपासून शनिवारी पहाटेपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. साधारणत: आठ इंच एवढ्या पावसाची नोंद सत्तरीत झाली आहे. यामुळे त्या परिसरात रात्री उशिरापासून पूरस्दृश स्थिती निर्माण झाली. तथापि पणजी वेधशाळेने वाळपई आणि सांखळी या परिसरात पावसाची कोणतीही नोंद दिली नाही. वास्तविक त्या भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करून तेवढ्या भागापुरता इशारा देणे आवश्यक होते तसा इशारा देण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर या भागात मुसळधार पाऊस गेले कित्येक दिवस पडत असून वेधशाळेमध्ये मात्र त्या तुलनेत नोंदच होत नाही. गेले कित्येक दिवस वाळपईतील नोंदच दाखविली जात नाही. नेमके कारण कळत नाही. त्यामुळे गोव्यात पडलेला पाऊस हा फारच आहे. वेधशाळेकडे मात्र फारच कमी प्रमाणात पाऊस दाखविला आहे. यामागे चूक कोणाची हे समजत नाही परंतु गोव्यातील बहुतांश पर्जन्यमापन केंद्र हे जलस्रोत खात्याकडे आहे आणि त्यांनी दिलेला अहवाल वेधशाळेकडे येतो त्यानंतर पाऊस किती पडला याचे प्रमाण ठरविले जाते. कित्येक दिवस वाळपई आणि सांखळीतून व्यवस्थितपणे पर्जन्यमापनाचा अहवाल गेला नसावा त्यामुळे तिथे पडलेल्या पावसाची हवामान खात्यात नोंद नाही अन्यथा गोव्यात ऑक्टोबरमध्ये पडलेल्या पावसाची नोंद आणखी वाढली असती व एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित झाला असता.
गेल्या 24 तासात धारबांदोडा येथे अडीच इंच, फोंडा पावणेदोन इंच, पेडणे, दाबोळी प्रत्येकी दोन इंच, म्हापसा दीड इंच, पणजी सव्वा इंच, मुरगाव एक इंच व सांगेमध्ये एक सेंटीमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली.