For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठ भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका

10:13 AM Mar 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
आठ भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका
Advertisement

7 जिल्ह्यांमध्ये 30 हून अधिक ठिकाणी लोकायुक्त छापे : कोट्यावधींचे घबाड आढळले

Advertisement

बेंगळूर : लोकायुक्त विभागाने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या भोवतीचा फास आणखी आवळला असून गुरुवारी बेंगळूरसह कोलार, कलबुर्गी, दावणगेरे, तुमकूर, बागलकोट आणि विजापूर या सात जिल्ह्यांत 8 भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवर लोकायुक्त विभागाने छापे टाकले. 30 हून अधिक ठिकाणी झालेल्या या कारवाईत कोट्यावधींचे घबाड आढळले आहे. या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. बेंगळूरमध्ये वास्तव्यास असलेले ग्रामविकास-पंचायतराज खात्यातील मुख्य अभियंता टी. डी. नंजुंडप्पा यांच्या बसवेश्वरनगरमधील निवासस्थानासह 7 ठिकाणी गुरुवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले.

14 अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. नंजुंडप्पा यांच्या निवासस्थानी 60 लाख रुपयांच्या वस्तू आढळल्या. 51 लाख रु. किमतीचे 841 ग्रॅम सोने, 4.66 लाख रु. किमतीची चांदी, तसेच 3.91 लाखांची रोकड आणि 60 हजार रु. किमतीचे विदेशी चलन आढळले आहे. आलिशान बंगल्यात 39-39 लाखांच्या चार कारही आढळल्या. नंजुंडप्पा यांच्याजवळ एकूण 8,46,22,953 रुपयांची मालमत्ता आढळली आहे. त्यात 7,46,47,466 रु. किमतीची स्थावर तर 99,75,466 ऊपयाच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे. बेंगळूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता एच. बी. कल्लेशप्पा यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यांच्याजवळ 6,50,52,663 स्थावर आणि जंगम मालमत्ता आढळली. त्यांच्या स्थावर मालमत्तेचे अंदाजे मूल्य 4,97,34,000 रु. असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

सार्वजनिक बांधकाम अभियंत्याकडे सोने, हिऱ्यांची दागिने

कलबुर्गी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता जगन्नाथ यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर हिरे, सोन्याचे दागिने आढळले. राजवाड्याप्रमाणे अंतर्गत सजावट असलेल्या या निवासस्थानी आढळलेले घबाड पाहून लोकायुक्त अधिकारी अचंबित झाले. कलबुर्गीतील एनजीओ कॉलनीतील निवासस्थानी 2 किलोपेक्षा अधिक चांदी, लॉकरमध्ये हिऱ्याची अंगठी, 30 हून अधिक सोन्याची नाणी, कोट्यावधी रुपयांचे सोन्याचे दागिने आढळले. जगन्नाथ यांच्या सेवानिवृत्तीला अवघे 25 दिवस शिल्लक आहेत. 31 मार्च रोजी ते निवृत्त होणार होते. जगन्नाथ यांच्याशी संबंधित आळंद, तावरगेरे, बिदर, बसवकल्याण या ठिकाणी 60 एकरहून अधिक जमीन आढळली आहे.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्याजवळ लाखेंची घड्याळे

दावणगेरे येथे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. नागराज यांच्या निवासस्थानावरील छाप्यात लोकायुक्त अधिकाऱ्यांना लाखो रुपये किमतीची घड्याळे, सोने आणि चांदीच्या वस्तू व इतर किमती वस्तू आढळल्या. त्यांच्याशी संबंधित 5 मालमत्तांना लोकायुक्त विभागाने लक्ष्य केले. कोलारमध्ये बेंगळूर वीजपुरवठा निगमचे (बेस्कॉम) साहाय्यक कार्यकारी अभियंता जी. नागराज यांची तीन निवासस्थाने, बेंगळूरच्या के. आर. पुरम येथील निवासस्थान, राजाजीनगर येथील कार्यालय, नातेवाईकांच्या घरातही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी झडती घेतली. त्यांच्याजवळ कोळ्ळेगाल येथे 6 एकर जमीन, बेंगळूरमध्ये एक बंगला, दोन भूखंड आढळले आहेत.

तुमकूरमध्ये कॉम्प्लेक्सवर धाड

तुमकूर जिल्ह्यातील शिरा तालुक्यातील तावरेकेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जगदीश यांच्या तुमकूर शहरातील मंजुनाथनगरमधील कॉम्प्लेक्स, शिरा तालुक्यातील यल्लेनहळ्ळी येथील निवासस्थान, बरगूर येथील आईच्या नावे असणाऱ्या मालमत्तंवर छापेमारी करण्यात आली.

Advertisement
Tags :

.