कंटेनर उलटून आठ जनावरे दगावली
हलगाजवळ घटना : 13 जनावरे जखमी
बेळगाव : जनावरे घेऊन जाणारा कंटेनर उलटून आठ जनावरे दगावली आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ सर्व्हिस रोडवर गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. एमएच 46, बीबी 5582 क्रमांकाच्या कंटेनरमधून जनावरे नेण्यात येत होती. मध्यरात्री कंटेनर उलटून आठ जनावरे दगावली. तर 13 जनावरे जखमी झाली आहेत. या घटनेची माहिती समजताच बजरंग दलाचे प्रवीण संताजी, प्रसाद बाचीकर, जोतिबा हेब्बाजी, बाबू धामणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी जनावरांना गोशाळेत पाठविण्याची जबाबदारी या कार्यकर्त्यांनी पार पाडली. हिरेबागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेनंतर कंटेनर चालकाने तेथून पलायन केल्याचे सांगण्यात आले. या कंटेनरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरे कोंबण्यात आली होती.