For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईद-ए-मिलादची मिरवणूक आज

06:58 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईद ए मिलादची मिरवणूक आज
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

रविवारी होणाऱ्या ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व उपनगरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून ईदनिमित्त दरबार गल्ली परिसरात पॅलेस्टाईन ध्वजाच्या धर्तीवर पेंडाल उभारण्यात आला होता. यासंबंधी वाद निर्माण होताच सायंकाळी पोलिसांच्या सूचनेवरून पेंडाल हटविण्यात आला आहे.

16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद साजरा करण्यात येणार होता. गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजाने पुढाकार घेऊन ही मिरवणूक 16 ऐवजी 22 सप्टेंबरला काढण्याचे ठरविण्यात आले होते. या निर्णयानुसार रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी बेळगावात ईदची मिरवणूक होणार आहे.

Advertisement

पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग व बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शांतता समितीची बैठकही झाली आहे. ईदची मिरवणूक शांततेत साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने व्यापक बंदोबस्त केला आहे.

दरम्यान ईदच्या पार्श्वभूमीवर दरबार गल्ली परिसरात पॅलेस्टाईन ध्वजाच्या रंगाचा पेंडाल उभारण्यात आला होता. यासंबंधी टीका होताच पोलिसांनी तो हटविण्याची सूचना दिली आहे. शनिवारी सायंकाळी तो हटविण्यात आला. ईदच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेल्या मिरवणुकीत पॅलेस्टाईनचा झेंडा फडकविण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावातही खबरदारी घेण्यात आली आहे.

बेळगावात गणेशोत्सव शांततेत पार पडला. आता ईदची मिरवणूकही शांततेत होणार, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी बोलून दाखविला. शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.