बेळगावमध्ये ईद ए मिलाद मिरवणूक उत्साहात
शहरासह उपनगरांमध्ये मिरवणुकीचे स्वागत : मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी-लोकप्रतिनिधी सहभागी
बेळगाव : बेळगाव शहर तसेच उपनगरांमध्ये मुस्लीम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची 1500 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने फोर्ट रोड ते कॅम्प या मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये विविध मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. फोर्ट रोड येथे झालेल्या कार्यक्रमाला बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी नारायण बरमणी, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे रणजित चव्हाण-पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, बाबुलाल राजपुरोहित, अमन सेठ यांच्यासह मुस्लीम धर्मगुरु मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी समस्त मानवतेसाठी कार्य केले आहे. दुसऱ्याला मदत करा तसेच समाजामध्ये शांतता निर्माण होईल, यासाठी प्रयत्नशील रहा असा संदेश त्यांनी दिला. तसेच बेळगावच्या मुस्लीम समाज व अंजुमन कमिटीने गणेशोत्सवात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी सलग तिसरे वर्ष ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलली. हे एक प्रकारचे बंधुत्वाचे प्रतीक असून संपूर्ण देशभर बेळगावचे बंधुत्व नावाजले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार असिफ सेठ यांनीही सर्वांना शुभेच्छा देत समाजामध्ये शांतता व एकता नांदण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहू, असे त्यांनी सांगितले. फोर्ट रोडपासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. जागोजागी पिण्याचे पाणी, आईस्क्रीम, फळे, अल्पोपहार वितरित केला जात होता. बँड तसेच डीजेच्या आवाजात सायंकाळपर्यंत मिरवणूक सुरू होती. कॅम्प येथील आसदखान दर्गा येथे मिरवणुकीची सांगता झाली.