अहंता आणि ममता
पूर्वी घराघरात जाळीची कपाटे असायची. हक्काचे घर समजून घरात कधीही येणाऱ्या मांजरीने दुधात तोंड घालू नये म्हणून दूधदुभते कपाटात असायचे. मांजरीचा धाकच असायचा बायकांना. दुधाच्या भांड्यावरची जाळीची ताटली पडल्याची चाहूल लागली की त्यांच्या पोटात धस्स व्हायचे. कितीही हाकला तरी निर्लज्जासारखी घरात वावरणारी ती मांजर व्याली की तिला प्रेम मिळायचे. तिची पायापायात घोटाळणारी पिल्ले कुणी झिडकारत नसत. ती वाघाची मावशी असली तरी तिचे माणसाशी पूर्वापार नाते आहे. सभोवती असणाऱ्या मांजरीच्या खोड्यांचा राग येऊन माणसाने तिला मारून टाकू नये म्हणून पूर्वजांनी धाक घालून दिला होता की जर चुकूनही हातून मांजर मेले तर श्रीक्षेत्र काशी येथे जाऊन सोन्याची मांजरं दान करावी लागेल. ही अशक्य अशी शिक्षा वाटेला येऊ नये म्हणून माणसे सजग असत. मांजर आणि उंदीर दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू. मात्र त्यांची जोडी माणसाच्या विश्वात अमर आहे. ‘उंदराला मांजर साक्ष’ ही म्हण आजही भाषेमध्ये प्रचारात आहे.
कवी बा. भ. बोरकर मांजरीला ‘पतंजलीची आई’ म्हणतात. कारण ती योगासने लीलया करते. मांजरीचे शरीर लवचिक असते. ती मिताहारी आहे. थोडे खाण्यामुळे तिचे शरीर हवे तितके वाकू, वळू शकते. ती लठ्ठ होत नाही. निसर्गाचा खेळ अजब आहे. मांजरीला एका विणीमध्ये साधारणत: आठ पिल्ले होतात. परंतु बोका तिच्या पिल्लाचा काळ होतो. तिचे एखाददुसरे पिल्लू त्याच्या तावडीतून वाचते. कवी म्हणतात,
‘तिचे यौवन राखाया पोरे खाई का भ्रतार
काय एकासाठी वाहे माय आठांचा हा भार
त्याग-भोगाचा हा खेळ कळेपरी आकळेना
मात्र सृजनाकारणे अर्थ जीवना-मरणा’
समर्थ रामदास स्वामींकडे त्यांचा एक लाडका बोका होता. समर्थ त्याला ‘बोकाराम’ असे म्हणत. भोजनापूर्वी ते त्याला तूपभात, दहीभात खायला घालून, पाणी पाजून, ‘रामा तू तृप्त झालास ना रे?’ असे म्हणून स्वत: नंतर जेवत असत. चांगला गुबगुबीत झालेला हा बोका निसर्गदत्त सवयीने दूधदुभत्याची सांडलवंड करीत असे. एक दिवस शिष्यांना त्याचा राग अनावर झाला व त्यांनी त्याच्या डोळ्यांत तिखट घातले. बोकाराम कोपऱ्यात जाऊन बसला. जेवणापूर्वी समर्थांनी त्याला हाक मारली परंतु तो काही आला नाही. समर्थांना खरी हकीकत कळताच त्यांनी त्याला शोधून आणून त्याचे डोळे पुसून तूप लावले व प्रेमाने भरवले. समर्थ शिष्यांना म्हणाले, ‘तुम्ही तेवढे देवाचे आणि देवाचे खाणारे. तो कोणी चोर आहे की काय? सारे जीव रघुपतीचे आहेत. ह्यापुढे त्याला कोणी असा उपद्रव देऊ नये. समर्थांनी म्हटलेच आहे ‘आम्ही काय कुणाचे खातो रे, तो श्रीराम आम्हाला देतो रे’
संत नामदेवांचा एक अभंग आहे, त्यात ते म्हणतात,
‘मांजरे केली एकादशी इळभर होते उपवासी
यत्न करिता पारण्यासी धावूनी गीवसी उंदीरू’
मांजराने एकादशीचा उपास केला तरी तो उंदीर धरूनच पारणे फेडणार. भगवंत म्हणतात, उपभोग प्रवृत्ती मनात जोपासत राहून बाह्य कर्म संपवणारे लोक मिथ्याचारी आहेत. मनात ज्ञान उत्पन्न झाले की अहिंसेचे चित्र उमटते. ते कसे असते हे सांगताना भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले आहे,
‘पै मोहाचीने सांगडे । लासी पिली धरी तोंडे
तेथ दातांचे आगरडे । लागती जैसे?’
जेव्हा मांजर मायेने आपले पिल्लू तोंडात धरते त्यावेळी त्या पिल्लास जसे दात लागत नाहीत, तितक्या हळुवारपणे भूमीवर पाय ठेवीत तो अहिंसक पुरुष चालतो. ते पाय जिथे लागतील तेथील जिवांना सुख होते. मांजरी घरात फार त्रास द्यायला लागल्या तर लोक त्यांना एका पोत्यात बंद करून दूर दूर सोडून येत. परंतु काही काळानंतर मांजर अनेक मैलांचा प्रवास करून बिनचूक स्वगृही परतत. हे कसे शक्य आहे तर मांजरांना दिशांचे ज्ञान असते. मांजरांचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे त्यांना माणसांच्या डोळ्यांपेक्षा सहा पट जास्त दिसण्याची क्षमता असते. मांजरांना कमी प्रकाशातही दिसते.
उंदीर हा अतिशय उपद्रवी पण चतुर प्राणी आहे. प. प. टेंबे स्वामी म्हणतात, मांजराने घरातल्या उंदराला पकडले तर माणसाला हायसे वाटते. मात्र ह्याच मांजराने पिंजऱ्यातल्या पोपटाला धरले की वाईट वाटते. माणसाची अहंता-ममता एवढी सूक्ष्म असते. जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे बंधू कान्होबा हे देहामधील षडविकारांना उंदीर म्हणतात.
‘ओले मृत्तिकेचे मंदिर
आत सहा जण उंदीर
गुंफा करिताती पोखर
याचा नका करू अंगीकार’
माणसाचा देह मोक्षाचे साधन आहे. परंतु जर काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर या सहा जणांचे राज्य तिथे प्रस्थापित झाले तर पुढील सारे जन्म पोखरले जातात. या सहा जणांना ते उंदीर म्हणतात.
श्रीरामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायचे. एकदा एक घार, मेलेला उंदीर तोंडात धरून, उंचच उंच आकाशात उडत होती. त्या उंदराला बघून कावळे, गिधाडे तिच्या मागे लागले. तिला चोचीने टोचू लागले. कारण त्यांना ते भक्ष्य हवे होते. चिडलेल्या घारीने प्रतिघातासाठी म्हणून आपल्या चोचीने एका गिधाडाला मारले तर काय, उंदीर तिच्या चोचीतून पडला. त्याबरोबर आकाशात तिच्या मागे उडणारी गिधाडे, कावळे यांची गर्दी निघून गेली. रामकृष्ण म्हणतात, ‘मी’पणाचा उंदीर तोंडात धरून माणूस अध्यात्माच्या अवकाशात लहरत असतो तेव्हा सुखदु:खाच्या अनुभवांची गर्दी त्याचा पाठलाग करते. मीपणाचा उंदीर जेव्हा निसटून जातो तेव्हा शांती तुमच्या भेटीला येते. तिच्यासोबत आनंद येतो.
ब्रह्मदेवाने मनुष्यदेह तयार करताना सृष्टीमधल्या प्रत्येक जिवाचा काही ना काही स्वभाव त्यात ओतला आहे. त्यामुळे ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असे म्हणत असावेत. गुण तेवढे आत्मसात करून दोष काढून टाकण्याची अक्कल फक्त मनुष्यालाच आहे यात शंका नाही.
-स्नेहा शिनखेडे