विद्यार्थ्यांना आठवड्यातून चार दिवस अंडी वितरण
आठवड्यातून सहा दिवस पूरक पोषण आहार
बेंगळूर : राज्यातील शालेय मुलांमधील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने आठवड्यातून सहा दिवस पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारी आणि अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन दिवस अंडी वितरित केली जातात. मात्र आता विद्यार्थ्यांना आठवड्यातून चार दिवस अंडी वितरण केले जाणार आहे.
कर्नाटक सरकार, शालेय शिक्षण-साक्षरता खाते आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन, बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षर दासोह-मध्यान्ह आहार योजनेंतर्गत राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुलांना 6 दिवसांसाठी पूरक पौष्टिक आहार देण्यात येणार आहे. बेंगळूरमध्ये शनिवारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चालना दिली.
याप्रसंगी सिद्धरामय्या म्हणाले, मुलांचे मानसिक आरोग्य आणि उत्तम शिक्षणासाठी दर्जेदार आहार अत्यावश्यक आहे. गरीब मुलांना उत्तम शिक्षणाची संधी निर्माण करणे हा सरकारचा हेतू आहे. अनेक ठिकाणी उपाहार मिळत नसल्याने मुले शाळेत दुपारपर्यंत उपाशी राहत असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे सरकारने आठवड्यातून दोन दिवस पूरक पोषण आहार म्हणून अंडी देण्याचा निर्णय घेतला होता. आता आठवड्यातून चार दिवस अंडी व पूरक पोषण आहार देण्याच्या उदात्त कार्यात अझीम प्रेमजी फाऊंडेशनने सहभाग घेतला आहे, असे ते म्हणाले.
शालेय मुलांचा वैज्ञानिक आणि बौद्धिक विकास झाला तरच ते सामाजिकदृष्ट्या जबाबदार बनू शकतात. गरिबांच्या मुलांसाठी चांगल्या शैक्षणिक संधी निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे. या कारणासाठी गणवेश, बूट-सॉक्स वितरण केले जात आहे. अधिकाधिक निवासी शाळा उघडल्या जात आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमप्रसंगी शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा, विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी आणि त्यांच्या पत्नी, सरकारचे अप्पर मुख्य सचिव एल. के. अतिक, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव नासीर अहमद, गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीचे उपाध्यक्ष मेहरुज आदी उपस्थित होते.