मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न : मुख्यमंत्री
वृत्तसंस्था /इंफाळ
मणिपूर सरकार शांतता चर्चेसाठी काम करत असून यासंबंधी आसामच्या सिलचरमध्ये अनेक बैठका झाल्या आहेत. आम्ही आमदार आणि अन्य सदस्याच्या मदतीने शांतता चर्चेसाठी जोरदार प्रयत्न करत आहोत. यासंबंधी लवकरच घोषणा करू अशी माहिती मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी गुरुवारी दिली आहे. अटक किंवा अन्य कठोर पावले उचलल्यास कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. मणिपूर हिंसेचा राजकीय कारणासाठी वापर केला जात असल्याने स्थिती बिघडत आहे. काही घटक राजकारण करत आहेत. अशाप्रकारच्या कृत्यांमध्ये सामील न होण्याचे आवाहन मी सर्वांना करत असल्याचे एन. विरेन सिंह यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून चौकशी होत असल्याचे सांगितले. या चौकशीनंतर कोणत्या त्रुटींमुळे हिंसा झाली हे कळणार आहे. तसेच हिंसेसाठी जबाबदार घटकांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.