ग्रामीण भागातील कुटुंबांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न हवेत
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : ग्रामीण भागातील कुटुंबांच्या सबलीकरणासाठी महिला स्व-साहाय्य गटाद्वारे स्वयंरोजगार सुरू करण्याबाबत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष द्यावे, ग्रामीण भागातील गरीब, अतिगरीब, दुर्बल वर्गाच्या कुटुंबांसाठी महिला स्व-साहाय्य गट स्थापन करून सरकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले. येथील जिल्हा पंचायत सभागृहात बुधवार दि. 13 रोजी झालेल्या राष्ट्रीय उपजीविका अभियान प्रगती आढावा व्हिडिओ संवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, तसेच अटल पेन्शन योजना विमा संदर्भात जनतेला माहिती देऊन त्यांना विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा.
वन-धन विकास केंद्र योजनेंतर्गत स्थानिकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती द्यावी. जलमित्र व कचऱ्याची विल्हेवाट यासंबंधी स्व-साहाय्य गटांना माहिती देऊन स्वच्छता राखण्यासंबंधी त्यांना मार्गदर्शन करावे. ‘आमचे गाव आमच्या योजना’ अंतर्गत महिला स्व-साहाय्य गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलनासाठी कार्यक्रम हाती घ्यावेत. जेपीएलएफ अंतर्गत उपलब्ध असलेला निधी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी वापरावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या. जि. पं. चे योजना संचालक रवी बंगारप्पन्नावर, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पंचायत कार्यकारी अधिकारी, सर्व तालुका पंचायतींचे साहाय्यक संचालक (पंचायतराज), जिल्हा पंचायतीचे एनआरएलएम कर्मचारी व तालुका स्तरावरील एनआरएलएम कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.