For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार

06:31 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार
Advertisement

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकार पंडित होते. त्यांचा विविध विषयांवरील व्यासंग अफाट होता. त्यांनी अनेक विषयांवर मूलभूत चिंतन केले. त्यामधूनच त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदेची निर्मिती केली आहे. या ग्रंथसंपदांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वसमावेशक आणि समन्यायी अशी वैचारिक भूमिका ही वेळोवेळी स्पष्ट झाली आहे. हाच धाग पकडत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण त्यांच्या शैक्षणिक विचारांच्या काही पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत...

Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. मानवी जीवनातील सर्व महत्त्वांच्या क्षेत्रांना त्यांनी स्पर्श केला आहे. त्यामध्ये काही ठोस भूमिका मांडली आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यामुळे बाबासाहेबांची  ओळख विविधांगी बनली आहे. घटनाकार, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानवमुक्तीचे महानायक, दीनदुबळ्या, दलितांचे मुक्तिदाते अशी भली मोठी यादी त्यांच्याबद्दल तयार होते. भारतीय शिक्षण पद्धतीत हस्तक्षेप करुन तिच्या माध्यमातून परिवर्तन घडविणारे शिक्षणतज्ञ डॉ. आंबेडकर अशी एक महत्त्वाची ओळखही त्यांची आहे.

भारत देशातील मागास आणि काही निवडक घटकांना जाणीवपूर्वक अज्ञानात ठेवून त्यांचे शोषण करण्याच्या हेतूनेच आपल्या शिक्षण व्यवस्थेची उभारणी झाली होती. त्यामुळे हजारो वर्षांपासून स्त्री आणि शुद्र यांना शिक्षणाची संधी कधीच मिळाली नाही. उलटपक्षी त्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना कठोर शिक्षा द्यावी, असं मनुस्मृतीसारख्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले होते. यामुळे भारतामधील महिला व अस्पृश्य हे दीर्घकालावधीपर्यंत गुलामगिरीत राहिले होते. मात्र यामध्ये ब्रिटीश राजवटीपासून बदल होण्यास प्रारंभ झाला. महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी प्रयत्नांमुळे या पारंपरिक व्यवस्थेला छेद देण्याचे काम केले. या दाम्पत्याने स्त्राr, अस्पृश्य, कष्टकरी वर्गाला शिक्षणाची दारे उघडून या वर्गाला मुक्तीच्या दिशेने नेले. यामुळेच स्वाभाविकपणे बाबासाहेबांचे शिक्षण विषयक विचार समजावून घेताना महात्मा फुले यांचे संदर्भ देखील आपल्याला नाकारता येणार नाहीत. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया घातला तर मुलींना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला. बाबासाहेबांनी त्याकाळात उच्च शिक्षणाचा आग्रह धरला. स्वत: बाबासाहेबांनी त्याकाळातील उच्च शिक्षण संस्थांमधून विदेशामधून शिक्षण घेतले होते. या कारणास्तव बाबासाहेबांच्या शिक्षणाला व्यवहारांची जोड मिळाली होती.

Advertisement

बाबासाहेबांचे शिक्षण विषयक विचार समजावून घेताना त्यांनी दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाला विशेष महत्त्व दिले आहे. व्यवस्था परिवर्तनाची हीच रणनीती ओळखली जाते. शिक्षणामुळे गुलामगिरी संपते आत्मभान येते. अस्तित्व आणि अस्मिता निर्माण होते. यामुळे त्यांच्या चळवळीत शिक्षणाला महत्त्व होते. शिक्षणात केवळ करिअरला अर्थ नाही, तर संघटित होऊन आपल्या समाजातील मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक गुलामगिरीच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा दिली पाहिजे असे, बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते.

बाबासाहेबांनी औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही शिक्षणाला महत्त्व दिले आहे. बाबासाहेबांच्या समकालीन बहुतेक सहकाऱ्यांना शिक्षणाची फारशी संधी मिळाली नाही. परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक जीवनाचा प्रचंड विकास केला. त्याप्रमाणे त्यांनी हुशार तरुण, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा दिली.

भारतीय संविधानात बाबासाहेबांच्या शैक्षणिक विषयांच्या विचारांचे पडसाद उमटल्याचे दिसून आले आहेत. राज्यघटनेतील मूलभूत हक्कातील समता विषयक अधिकारात कलम 15 नुसार सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील समाज घटकालाच आरक्षण देऊ केले. त्यामधून शिक्षण विषयक आरक्षण, नोकरी विषयक आरक्षण आणि राजकीय आरक्षण उदयास आली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्कालीन शिक्षण विषयक विचार, धोरण यांना आताच्या सामाजिक बदलामध्ये लागू करताना, आजचे 21 वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटांच्या क्रांतीचे शतक म्हणून पहावे लागणार आहे.

सध्या जग हे एका बोटाच्या क्लिकवर येऊन थांबले आहे. यामध्ये स्मार्टफोन, रोबोटो, व्हर्च्युल जीवनातील ‘एआय’चा होत असणारा प्रवेश याकडे आता प्रत्येक घटकांने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण सध्याच्या घडीला उच्च शिक्षण असो अन्य कोणतेही शिक्षण असो, त्याकरीता आता उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानात साक्षर होण्याची गरज अधिक असल्याचेही अभ्यासकांचे मत आहे. कारण डॉ. बाबासाहेबांकडे बदल स्वीकारण्याची व नवनवीन गोष्टींना शोधण्याची जिद्द प्रचंड होती. यामुळे आपल्याला त्यांच्या विचारांचे पाईक व्हायचे असल्यास बदलत्या तंत्रज्ञानासह प्रत्येकांकडे असणाऱ्या स्मार्टफोनकडे संवादाचे माध्यम म्हणून न पाहता त्याला उद्याचा शिक्षणाचा मार्ग, व्यवसायाचा मार्ग, आपल्या परिवतर्नाचा मार्ग म्हणून पहावे लागणार आहे. तरच आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आज आपण मानवंदना देण्यास पात्र होईल.

सागर कांबळे

Advertisement
Tags :

.