राजलक्ष्मी चिल्ड्रन फाऊंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
एक हजार विद्यार्थ्यांना मिळाली मदत : पदाधिकाऱ्यांची माहिती
बेळगाव : शहरी तसेच ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी बेळगावचे राजलक्ष्मी चिल्ड्रन फाऊंडेशन कार्यरत आहे. मागील चार वर्षात एक हजार आर्थिक मागास विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण दिले जात आहे. यापैकी बरेच विद्यार्थी सध्या मेडिकल, इंजिनिअरिंग तसेच विज्ञान विभागात उच्चशिक्षण घेत असल्याची माहिती फाऊंडेशनचे सदस्य डॉ. रवींद्र गुरण्णावर यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सरकारी तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रतिभापोषक हा उपक्रम राबविला जात आहे. 2022 पासून फाऊंडेशनच्या माध्यमातून बेळगावसह आसपासच्या जिल्ह्यात या उपक्रमाला चालना देण्यात आली आहे. पहिल्या वर्षी 189, दुसऱ्या वर्षी 224, तिसऱ्या वर्षी 236 तर चौथ्या वर्षी 306 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. रामदुर्ग तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी बाळकृष्ण भीमाप्पा बजंत्री हा प्रतिभापोषक उपक्रमाचा एक हजारावा विद्यार्थी ठरला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाते. काही स्वयंसेवी संस्था तसेच फाऊंडेशन या विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला अंदाजे 74 हजार रुपये खर्च केला जात आहे. केवळ शिष्यवृत्ती न देता या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात येते. यासाठी मार्गदर्शकांची निवड देखील करण्यात आली आहे.
शैक्षणिक साहित्य वितरण-विद्यार्थ्यांचा उद्या गौरव
रविवार दि. 20 रोजी सकाळी 10.30 वा. विद्यार्थ्यांचा गौरव तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे. अयोध्यानगर, कोल्हापूर सर्कल येथील राजलक्ष्मी चिल्ड्रन फाऊंडेशनच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती डॉ. कीर्ती शिवकुमार यांनी दिली. यावेळी फाऊंडेशनचे सदस्य डॉ. शशिकांत कुलगोड, डॉ. विजयलक्ष्मी कुलगोड, एम. एन. सिंदूर उपस्थित होते.