मराठी शाळेमध्ये कन्नड शाळा घुसडण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न
वडगावमधील प्रकार, मराठी भाषिकांतून तीव्र संताप
बेळगाव : शिक्षण विभागाकडून मराठी माध्यमाच्या शाळांना लक्ष्य करण्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. वडगाव येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेत पटसंख्या अधिक असतानाही दुसरीकडील कन्नड माध्यमाची शाळा घुसडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आलेली शाळा आता कायमस्वरुपी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वडगाव राजवाडा कंपाऊंड येथील अनेक वर्षांची परंपरा लाभलेली मराठी मुलांची शाळा क्रमांक 31 व मुलींची शाळा क्रमांक 33 एकत्रित चालविल्या जातात. या ठिकाणी मुलांच्या शाळेची पटसंख्या 100 तर मुलींच्या शाळेची पटसंख्या 170 आहे.
पटसंख्या अधिक असल्यामुळे शाळा व्यवस्थित सुरू होती. परंतु दोन वर्षांपूर्वी देवांगनगर येथील कन्नड शाळा तात्पुरत्या स्वरुपात या ठिकाणी सुरू करण्यात आली. शाळेला योग्य जागा उपलब्ध नसल्याने काही दिवसांसाठी याठिकाणी स्थलांतर केले जाईल, असे सांगण्यात आल्याने एसडीएमसी कमिटीनेही विरोध केला नाहे. आता दोन वर्षांनी 31 नंबर शाळेमध्येच देवांगनगर शाळा कायमस्वरुपी चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोठा संघर्ष करून वडगावमधील नागरिकांनी मराठी मुलांची शाळा क्रमांक 31 चे बांधकाम केले होते. सरकारी शाळांमधील पटसंख्या कमी होत असताना या शाळेने चांगली पटसंख्या राखून ठेवली आहे. त्यामुळे शाळेचा विकास करण्याऐवजी दुसरीकडील कन्नड शाळा घुसडण्यात येत असल्याने भविष्यात याचा परिणाम मराठी शाळेला भोगावा लागणार आहे. त्यामुळे परिसरातील मराठी भाषिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
कन्नड शाळेला विरोध नाही परंतु...
स्थानिकांनी मराठी शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना शिक्षण विभागाच्या तुघलकी निर्णयामुळे शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होणार आहे. स्थानिकांचा कन्नड शाळेला विरोध नसून ती मराठी शाळेमध्ये स्थलांतरीत न करता इतरत्र स्वतंत्र इमारत बांधून शाळा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शिक्षण विभागाबाबत नाराजी...
यासंदर्भात स्थानिकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारी आदेशाप्रमाणेच शाळेचे स्थलांतर दोन वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सरकारी इमारत असल्यामुळे कोणत्याही माध्यमाचे वर्ग येथे भरविले जाऊ शकतात, असे उत्तर देण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.