For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऐन सणासुदीत खाद्यतेल महाग

06:27 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऐन सणासुदीत खाद्यतेल महाग
Advertisement

आयात शुल्कात 20 टक्क्यांची वाढ, कांद्यासह तांदळावरील निर्यात मूल्य हटवल्याने दिलासा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क (कस्टम ड्युटी) वाढवत ऐन सणासुदीत सर्वसामान्य जनतेला धक्का दिला आहे. पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावर ही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता खाद्यतेलांवरील आयात शुल्क 0 वरून 20 टक्के करण्यात आले आहे, तर रिफाइंड तेलावरील कस्टम ड्युटी आता 32.5 टक्के करण्यात आली आहे. आयात शुल्कामध्ये बदल केल्यानंतर शनिवारपासूनच तात्काळ तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. खाद्यतेलासंबंधी निर्णय जाहीर करण्यापूर्वी केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत किमान निर्यात मूल्य हटवले आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्मयांवरून 20 टक्के केल्याने हळूहळू कांद्याचे भाव कमी होतील, असेही बोलले जात आहे. कांद्याव्यतिरिक्त बासमती तांदळाच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्यही सरकारने काढून टाकले आहे.

Advertisement

केंद्र सरकारने क्रूड, रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल आणि अन्य खाद्य तेलांवरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयात शुल्कात 20 टक्के वाढ करण्यात आल्याने खाद्य तेल महागणार आहे. आयात शुल्कात वाढ करून एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा पडणार आहे. ऐन सणासुदीत ही दरवाढ झाल्याने आता कौटुंबिक बजेट कसे मांडायचे हा प्रश्न गृहिणी वर्गाला सतावणार आहे. आता सप्टेंबर महिना सरत आला असून येत्या ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी सण आहेत. अशावेळी दसरा आणि दिवाळीपूर्वी सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलांच्या किमतीत वाढ होणार हे निश्चित आहे.

तेलांच्या किमती किती वाढतील?

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने कच्चे आणि शुद्ध सूर्यफूल तेल, पाम तेल आणि सोयाबीन तेलासाठी मूळ सीमाशुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. हे 20 टक्के आणि 32.5 टक्के करण्यात आले आहे. कस्टम ड्युटीमध्ये बदल केल्यानंतर नवीन दर शनिवारपासून म्हणजेच 14 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. आयात शुल्कात केलेल्या वाढीमुळे सर्व खाद्यतेलांवरील प्रभावी शुल्क वाढून 35.75 टक्के इतके होणार आहे. क्रूड पाम ऑईल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सनफ्लॉवर सीड ऑईलवरील प्रभावी शुल्क दर आता 5.5 टक्क्मयांनी वाढून 27.5 टक्के होणार आहे. तेच रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑईल, रिफाइंड पाम ऑईल आणि रिफाइंड सोयाबीन तेलावरील प्रभावी शुल्क आता 13.75 टक्क्मयांवरून आता 35.75 टक्के इतके होणार आहे.

शेतकऱ्यांना फायदा होणार

देशांतर्गत अन्नधान्याच्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी कांदा आणि बासमती तांदळावर निर्यात मूल्य लावले होते. केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोयाबीनच्या किमती वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार असल्याचा दावा केला जात असला तरी खाद्यतेल खरेदीदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

कांदा, तांदूळ स्वस्त होणार

खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवण्यासोबतच सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. मोदी सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्मयांवरून 20 टक्के करण्यात आले आहे. सरकारच्या या पावलाचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कांद्याच्या भावावर दिसून येणार आहे.

निर्यातीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी सरकारने शुक्रवारी कांदा आणि बासमती तांदळाची किमान किंमत मर्यादा रद्द केली. हे बदल आणि कपात 14 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. यापूर्वी 4 मे पासून 40 टक्के निर्यात शुल्क लागू झाले होते. बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला असून यामुळे देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल, असे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.