असंघटित कामगारांच्या किमान वेतनात वाढ
नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू : सण-समारंभांपूर्वी केंद्र सरकारकडून मोठी भेट
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
असंघटित क्षेत्रातील कामगारांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्त्यामध्ये (व्हीडीए) सुधारणा करून किमान वेतन दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील. कामगारांना राहणीमानाच्या वाढत्या खर्चाचा सामना करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने हे समायोजन करण्यात आले आहे, असे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने गुऊवारी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या दसरा-दिवाळी सणापूर्वी केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोठी भेट दिली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. महागाईमुळे राहणीमानाचा वाढता खर्च पाहता सरकारने हा निर्णय घेतला. सुधारित वेतन दरांचा फायदा इमारत बांधकाम, लोडिंग आणि अनलोडिंग, वॉच अँड वॉर्ड, झाडूकाम, साफसफाई, घरकाम, खाणकाम आणि कृषी क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या कामगारांना होणार आहे.
किमान वेतन दर कौशल्य स्तरांवर आधारित असून अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि उच्च कुशल तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार अ, ब आणि क अशा श्रेणींमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहेत. अकुशल कामासाठी बांधकाम, झाडूकाम, साफसफाई, लोडिंग आणि अनलोडिंग या क्षेत्रातील कामगारांसाठी किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन (रु. 20,358 प्रतिमहिना) आणि अर्ध-कुशल कामगारांसाठी 868 रुपये प्रतिदिन (रु. 22,568 प्रतिमहिना) असे निश्चित करण्यात आले आहेत. तर, कुशल वर्गासाठी 954 रुपये प्रतिदिन (रु. 24,804 प्रतिमहिना) आणि अत्यंत कुशल वर्गासाठी 1,035 रुपये प्रतिदिन (रु. 26,910 प्रति महिना) असे दर निश्चित करण्यात आले आहेत. नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील. त्यात शेवटची सुधारणा एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती. औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकातील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे केंद्र सरकार 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून प्रभावीपणे ‘व्हीडीए’मध्ये वर्षातून दोनदा सुधारणा करते. केंद्र सरकारच्या मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) यांच्या संकेतस्थळावर (clc.gov.in) क्षेत्र, श्रेणी आणि क्षेत्रानुसार किमान वेतन दरांची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.