सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांना ईडीचे समन्स
सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. पॉन्झी स्कीम घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्रिची येथील प्रणव ज्वेलर्सवर छापा टाकला होता. याच प्रणव ज्वेलर्सची प्रकाश राज जाहिरात करतात.यामुळे राज यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सक्तवसुली संचलनालयाने प्रणव ज्वेलर्स मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना समन्स पाठवले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , तामिळनाडूतील त्रिचीमधील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्समध्ये PMLA नुसार सर्च ऑपरेशन दरम्यान काही अशी कागदपत्रे मिळाली होती. ज्यामध्ये जवळपास २३ लाख ७० हजार रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराची माहिती मिळाली. इतकेच नाही तर, ईडीच्या छाप्यात ११ किलो ६० ग्राम सोन्याचे दागिनेही जब्त केले होते.
तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले होते की, जनतेकडून गोल्ड स्कीमच्या माध्यमातून जमवलेले १०० कोटी रुपये प्रणव ज्वेलर्सच्या मालकांनी अनेक शेल कंपन्यात गुंतवले होते. तपासात समोर आले की, प्रणव ज्वेलर्स आणि याच्याशी संबंधित लोकांनी फसवणूकीच्या माध्यमातून जमवलेले हे पैसे दुसऱ्या शेल कंपन्यांमध्ये डायवर्ट केले आहेत.
प्रकाश राज प्रणव ज्वेलर्सचे ब्रांड एम्बेसडर होते. मात्र प्रणव ज्वेलर्सचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी या ब्रँडशी संबंध संपवले. आता ते तपास संस्थेच्या रडारवर आले आहेत. आता त्यांना ईडीने समन्स बजावले असून लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.