ईडीकडून गोव्यातील 15 मालमत्ता जप्त
पणजी : गोव्यातील जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार रोहन हरमलकर याच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली असून ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 अंतर्गत गोव्यातील 15 मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. 19 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या नोटिसीनुसार जप्त केलेल्या मालमत्ता हणजूण, आसगांव, पर्रा, नेरुल, कळंगूट, वेर्णा येथील जमीन तसेच मडगावातील एका सदनिकेचा समावेश आहे. संबंधित सर्व मालमत्तांना पुढील आदेशापर्यंत विक्री, भेट, गहाणखत, तारण किंवा इतर प्रकारे हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती ईडीचे उपसंचालक प्रफुल्ल विलास वाबळे यांनी दिली आहे. ईडीने राज्यातील कथित जमीन हडप घोटाळ्यांशी संबंधित कायदेशीर वारस नसलेल्या जमिनीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कायदेशीर वारसांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत ज्यात त्यांना मालमत्तेवर कायदेशीर हक्क सांगण्यासाठी पुढे येण्यास सांगितले आहे. जर कोणीही दावा केला नाही तर त्या मालमत्तांची ईडी विल्हेवाट लावेल, असेही त्यांनी म्हटले आहे.