लॉटरी सम्राटाविरोधात ईडीचे धाडसत्र
वृत्तसंस्था/चेन्नई
भारतातील कुप्रसिद्ध लॉटरी सम्राट सांतियागो मार्टीन याच्या अनेक मालमत्ता आणि कार्यालयांवर प्रवर्तन निदेशालयाने धाड टाकली आहे. मार्टीन याने विविध राजकीय पक्षांना 1 हजार 300 कोटी रुपयांच्या देणग्या दिल्याचे लोकसभा निवडणुकीपूर्वी स्पष्ट झाले होते. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून या देणग्या देण्यात आल्या होत्या. या देणग्यांमुळे मार्टीन प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मार्टीनवर कारवाई करण्याची मुभा ईडीला दिली होती. चेन्नईतील कनिष्ठ न्यायालयाने त्याच्या विरोधातील प्रकरण बंद करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात ईडीने मद्रास उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मद्रास उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरविला होता.
मार्टीनच्या अनेक मालमत्ता
गुरुवारी सकाळपासूनच ईडीच्या अनेक अधिकाऱ्यांनी मार्टीन याच्या मालमत्तांच्या झडतीला प्रारंभ केला होता. त्याच्या किमान 20 मालमत्ता असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. चेन्नई आणि आसपासच्या भागात मार्टीन याची अनेक घरे आणि कार्यलये आहेत. त्याच्या नावावर शेतजमीनही असल्याचे बोलले जाते. लॉटरीच्या माध्यमातून त्याने हजारो कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता कमावल्याचा आरोप आहे. त्याच्यावर मनी लाँडरिंगचाही आरोप असून चौकशी केली जात आहे.
457 कोटीची मालमत्ता जप्त
सांतियागो मार्टीन याची 457 कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत ईडीने गोठविली आहे. मार्टीन याने आपल्या लॉटरी व्यवसायाला सिक्कीम या राज्यातून प्रारंभ केला होता. चार वर्षांच्या कालावधीतच तो या व्यवसायातून कोट्याधीश झाला. मात्र, त्याने लॉटरी व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नावर करचुकवेगिरी करुन सिक्कीम सरकारला 900 कोटी रुपयांचा चुना लावला असा आरोप आहे.
राजकारण्यांशी संबंध
मार्टीन याचे देशातील अनेक प्रादेशिक पक्षांशी निकटचे संबंध आहेत, असा आरोप केला जात आहे. त्याने ज्या पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणग्या दिल्या आहेत, त्यांच्यात अनेक प्रादेशिक पक्षांचाही समावेश आहे. निवडणूक रोखे योजनेतून आतापर्यंत दिल्या गेलेल्या देणग्यांची आणि देणगीदारांची सर्व माहिती उघड करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिला होता. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ही सर्व माहिती उघड केली होती. या महितीतून मार्टीन याचे अनेक राजकीय पक्षांशी असलेले संबंध स्पष्ट झाले होते. त्याचे लाभार्थी असलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशीही त्याचे जवळीकीचे संबंध आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते.