हजारो कोटींच्या ड्रग्जसंबंधी ईडीच्या धाडी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काही दिवसांपूर्वी दिल्लीत दिल्ली पोलिसांनी जप्त केलेल्या 7 हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या संबंधात ईडीने अनेक ठिकाणी धाडसत्राचा प्रारंभ केला आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानमार्गे भारतात आणण्यात आले होते, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. याप्रकरणी ईडीने सहा जणांविरोधात लुकआऊट नोटीस प्रसारित केली आहे. ब्रिटनचा एक नागरीक सविंदर सिंग हा या प्रकरणातील एक महत्वाचा संशयित आहे. त्याच्यासह आणखी पाच जण ईडीच्या रडारवर आहेत. त्यांना पकडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत 2 हजार कोटी रुपयांचे 208 किलो हेरॉइन पकडण्यात आले होते. तसेच त्याच्या आधी काही दिवस 5 हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या दोन्ही कारवायांच्या संदर्भात ईडी अधिक तपास करत असून एकंदर 18 संशयितांवर लक्ष देण्यात येत आहे.
बसोया विरोधात नोटीस
दुबईत वास्तव्यात असणाऱ्या विरेंदर बसोया याच्या विरोधात याच प्रकरणात कारवाई करण्यात येत आहे. बसोया हा तुषार गोयल याच्या साहाय्याने अंमली पदार्थांचे रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाल्यावरुन कारवाई करण्यात येत आहे. दिल्ली एनसीआर आणि मुंबईत या संदर्भात शुक्रवारी धाडी टाकण्यात आल्या. या धाडींमधून महात्वाची कागदपत्रे आणि माहिती हाती लागल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. मात्र, या धाडींसंबंधी सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच कोणाला ताब्यात घेण्यात आले आहे का, याचीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ईडीने कारवाईचा वेग वाढविला आहे.