झारखंडमध्ये ईडीचे 20 हून अधिक ठिकाणी छापे
मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमध्ये ईडीच्या पथकाने सोमवारी छापे टाकले आहेत. काही उद्योजक, एका मंत्र्याचा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणी ही झडती घेण्यात आली आहे. जलजीवन मिशनशी निगडित खंडणी रॅकेटप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीच्या एका टीमने रांचीमध्ये सुमारे 20 ठिकाणी छापे टाकले आहेत.
राज्याचे पेयजल आणि स्वच्छता मंत्री मिथिलेश ठाकूर आणि आयएएस अधिकारी मनीष रंजन यांच्याशी संबंधित रांची आणि चाईबासामध्ये 20 हून अधिक ठिकाणी ही कारवाई केली आहे. मिथिलेश ठाकूर यांचे बंधू विनय ठाकूर, त्यांचे खासगी सचिव हरेंद्र सिंह, मनीष रंजन आणि विभागाच्या अनेक इंजिनियर्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. मिथिलेश ठाकूर हे पूर्वी कंत्राटदार होते आणि वर्तमान राज्य सरकारमध्ये त्यांचा मोठा दबदबा असल्याचे मानले जाते. ग्रामीण विकास घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले मनीष रंजन हे दीर्घकाळापर्यंत पेयजल तसेच स्वच्छता विभागात सचिव राहिले आहेत. पेयजल आणि स्वच्छता विभागात 4 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला असून याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयात एक जनहिता याचिकाही दाखल करण्यात आली आहे.