For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झारखंडमध्ये ईडीच्या छाप्यात सापडले नोटांचे घबाड

06:01 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
झारखंडमध्ये ईडीच्या छाप्यात सापडले नोटांचे घबाड
Advertisement

रांचीमध्ये 9 ठिकाणी छापे : मंत्र्याच्या पीएच्या नोकराकडे सापडली 25 कोटींची रोकड

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी सकाळी रांचीमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या सेवेत असलेल्या नोकराच्या घरातून 25 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त केली आहे. जप्त झालेल्या रोख रकमेची मोजणी सोमवारी रात्रीपर्यंत सुरू होती. हा छापा झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के. राम यांच्याशी संबंधित प्रकरणाशी संबंधित सुरू असलेल्या तपासाचा हा एक भाग आहे.

Advertisement

झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या घरगुती नोकराकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. संजीव लाल यांच्या घरगुती नोकराच्या निवासस्थानावर छापे टाकण्याबरोबरच ईडीने रांचीमधील इतर ठिकाणीही शोध घेतला आहे. मंत्री आलम यांचे निकटवर्तीय असलेले रस्ते बांधकाम विभागाचे अभियंता विकास कुमार यांच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात आला असून त्याठिकाणी 3 कोटीहून अधिक रोकड जप्त करण्यात आल्याचे समजते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच ही मोठी कारवाई झाल्याने राज्यात खळबळ निर्माण झाली आहे.

रांचीतील ग्रामीण बांधकाम विभाग येथे मुख्य अभियंता म्हणून नियुक्त वीरेंद्र कुमार राम यांनी कंत्राटदारांना निविदा वाटपाच्या बदल्यात कमिशनच्या नावाखाली कोट्यावधींची कमाई केल्याचा आरोप एजन्सीने गेल्यावषी जारी केलेल्या निवेदनात केला होता. गुन्ह्यातून मिळालेल्या कमाईचा वापर वीरेंद्र कुमार राम आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आलिशान जीवनशैली जगण्यासाठी केला होता, असा आरोपही होता. त्यानंतर एप्रिलमध्ये या अधिकाऱ्याची 39 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता अन्य संबंधितही ईडीच्या रडारवर आले आहेत.

भाजपचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

राज्यात ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू झाले आहेत. भाजप खासदार दीपक प्रकाश यांनी झारखंडमधील सत्ताधारी आघाडी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्यावर जोरदार टीका केली. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद झारखंडला ‘लूटखंड’ बनविण्याचे काम करत आहेत. आज पुन्हा 25 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली असून ती सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांची असल्याचा दावा प्रकाश यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.