दोनापावला, वास्कोत ‘ईडी’चे छापे
उत्तर प्रदेश अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई : गोवा, दिल्ली, चंदीगडसह 11 ठिकाणी छापासत्र,तब्बल 636 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा संशय
पणजी : उत्तरप्रदेश येथील अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोव्यातील दोन ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे आर्थिक गुह्यांशी संबंधित असलेल्यांची धाबे दणाणले आहेत. हे दोन्ही छापे काल बुधवारी सकाळी टाकण्यात आलेले आहेत. गोव्यातील शारदा एक्सपोर्ट कंपनीचे मालक जितेंद्र गुप्ता आणि त्याची सहकारी कंपनी हसंदा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोनापावला आणि वास्को येथील आस्थापनांवर छापे टाकून एक्सपोर्ट व बिल्डिंग व्यवसायासंबंधी महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले आहेत.
गोव्यात छापा टाकण्यात आलेल्या व्यवसासाशी संबंधित मालक मूळचा उत्तरप्रदेश मेरठ येथील असून दिल्लीत त्याचा दबदबा आहे. तो एक्सपोर्ट बिझनेस तसेच बिल्डर म्हणून प्रसिद्ध आहे. कोविड काळापूर्वी त्याने 330 फ्लॅट विकण्यासाठी ग्राहकांकडे करार करून आगावू पैसे घेतले होते. पण, कोरोना काळ नडल्यामुळे धंदा नुकसानीत गेला. एकूण 636 कोटी ऊपये गुंतवणूकदारांचे देणे असल्याने त्याच्याविऊद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
गोव्यात दोन्ही ठिकाणी छापे टाकून अमलबजावणी संचालनालयाने नेमके कोणते दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत याचा तपशील मिळाला नसला तरी काही फाईल्स, कागदपत्रे, लॅपटॉप, संगणकाची हार्डडिस्क जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय बँक खात्यांची माहिती मिळवण्यात आली आहे. मच्छी निर्यात व्यवसाय आणि जमीन खरेदी विक्री व बिल्डर म्हणून जितेंद्र गुप्ता गोव्यात कार्यरत आहे. दोनापावला येथे त्याचा बंगाला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील त्याचे घर, फॅक्टरी, कोल्ड स्टोअरेज, आईस फॅक्टरी आणि कार्पेट फॅक्टरीवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मेरठसह दिल्ली, चंदीगड आणि गोव्यात एकाच वेळी 11 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.